अहिल्यानगर: संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी पालखी दिंडीचे आज, बुधवारी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरचा हा पहिलाच पालखी सोहळा असल्याने यंदाचा सोहळा विशेष उत्साहात सुरू झाला. सुमारे ३० दिंड्यांसह हजारो वारकरी “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या अखंड नामघोषात सहभागी झाले. नेवासे बस स्थानक परिसरात पालखीचा पहिला रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात रंगला.
दिंडीचे नेतृत्व ज्ञानेश्वर मंदिराचे देविदास महाराज म्हस्के, हभप रामभाऊ राऊत आणि राम महाराज झिंजुरके करत आहेत. प्रस्थानापूर्वी माऊलींच्या पादुकांचे व पैस खांबाचे पूजन भास्करगिरी महाराज, उद्धव महाराज, ज्ञानेश्वर कदम, देविदास महाराज म्हस्के, रमेशानंदगिरीजी महाराज, ऋषिनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या हस्ते मंत्रघोषात करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. पालखीच्या रथाचे मानाचे बैल व मानाचे अश्वाचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, रत्नमाला लंघे, देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शंकरराव लोखंडे, प्रभाकरराव शिंदे, उदयन गडाख, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, डॉ. क्षितिज घुले, नंदकुमार पाटील, ॲड. संजय सुखदान यांच्या हस्ते पालखी रथातील पादुकांचे पूजन करण्यात आले.
दिंडीच्या अग्रभागी भागवत धर्माची पताका, त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला, भजनी मंडळे, टाळ-मृदुंगाच्या गजरात चालणारे वारकरी आणि पुष्पांनी सजविलेल्या चांदीच्या रथात माऊलींच्या पादुका होत्या. रथाचे पुढे मानाच्या दोन दिंड्या होत्या. इतर दिंड्या शिस्तीत पालखीच्या मागे चालल्या. दिंडीने नेवासे शहराला प्रदक्षिणा घातली.
नेवासे शहरातील विविध चौकांत फटाक्यांची आतषबाजी, तोफांची सलामी, रांगोळ्या आणि पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. प्रदक्षिणामार्ग नंदकुमार खरात महाराज, उद्धव महाराज नेवासकर, अंकुश महाराज जगताप यांनी पालखीचे स्वागत केले. नगरपंचायत चौकात स्व. राजेंद्र मापारी मित्र मंडळाने जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली, तर नगरसेवक स्वप्नील मापारी यांनी संतांचा सत्कार केला.
व्यसनमुक्तीची दिंडी
नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या संकल्पनेतून व चित्रकार भरतकुमार उदावंत आणि सत्यजित उदावंत यांच्या पुढाकारातून याच दिंडीमध्ये व्यसनमुक्तीची दिंडी देखील निघाली. चित्रकार उदास यांनी रेखाटलेले व्यसनमुक्तीचे घोषवाक्य असलेले फलक आमदार लंघे, पोलीस निरीक्षक दराडे यांच्यासह दिंडीतील सर्वच महाराज व महिला मंडळांनी हाती घेतले होते.
