एसटी महामंडळाला स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व आणि सरकारी नियंत्रणाच्या साखळ दंडातून मुक्त केले पाहिजे. एसटीच्या अनेक प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सरकारने प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केली.
एसटी महामंडळाच्या अस्तित्वाचा प्रश्न भेडसावत असून यात अवैध प्रवासी वाहतूक, शासकीय येणी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासंदर्भात भूमिका मांडताना छाजेड यांनी एका पत्रकार परिषदेत एसटी महामंडळाला सामाजिक व सरकारी नियंत्रणाच्या जोखडदंडातून मुक्त करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, एसटी वर्कर्स इंटकच्या नाशिक येथील अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच प्रश्नांचा ऊहापोह करीत अनुकूल प्रतिसाद दिला. त्यातून एसटी कामगारांना गेल्या २५ जून रोजी कराराप्रमाणे किमान वेतनाच्या थकबाकीतील पहिला हप्ता मिळाला आहे. येत्या २ जुलै रोजी परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा इंटकची बैठक होणार असून त्यावेळी एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने चर्चा घडवून आणली जाणार आहे. स्पर्धेच्या युगात एसटी महामंडळाला सरकार नियंत्रणातून मुक्त केल्यास स्पर्धेत टिकण्याची क्षमता आपोआप सिध्द होईल. तेवढी क्षमता एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचा दावा छाजेड यांनी केला.
यावेळी इंटकच्या जिल्हाध्यक्षपदी धर्मा भोसले यांची निवड जाहीर करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, सुनील मालप, अमोल शिंदे, बंडोपंत वाडकर, इंटकचे मुकेश तिगोटे आदी उपस्थित होते.