जालना : करोना संदर्भातील निर्बंध राज्यात हटविण्यात आले असले, तरी नागरिकांनी लसीकरण मात्र करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. करोना प्रतिबंधक लसीची ज्यांची पहिली किंवा दुसरी मात्रा बाकी असेल त्यांनी ती घ्यावी, कारण ते आरोग्यासाठी हितकारक असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागातील माहितीनुसार गुरुवारी सकाळपर्यमंत राज्यात सात कोटी ९५ लाख ७१ हजारांपेक्षा अधिक करोनाच्या प्रयोगशाळा चाचण्या झाल्या. त्यापैकी ७८ लाख ७४ हजार ६९० (९.१० टक्के) नमुने करोनाबाधित निघाले. ७७ लाख २६ हजार रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यात एक लाख ४७ हजार ८०० (१.८७ टक्के) करोना रुग्णांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत मराठवाडय़ात सात लाख १५ हजारांपेक्षा अधिक करोनाबाधित आढळून आले. यापैकी १७ हजार ५१२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सक्रिय करोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या बुधवारी राज्यात ही संख्या ८६५ होती.
जालना जिल्ह्यात सर्व गटांतील ७९ टक्के नागिरकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. तर ५८ टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. जिल्ह्यात १२ ते १४ वर्षे वयोगटात ७० हजार ७३२ लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.
यापैकी ४१ टक्के पहिले लसीकरण झाले आहे. तर १५ ते १७ वर्षे वयोगटात ६६ टक्के पहिले तर ३९ टक्के दुसरे लसीकरण झालेले आहे.
‘एक्सई’चे जनुकीय क्रम निर्धारण
राज्यात आढळून आलेल्या करोना विषाणूच्या ‘एक्सई’ या उत्परिवर्तित प्रकाराच्या संदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हटले आहे की, मुंबईत ५० वर्षे वयाच्या एका दक्षिण आफ्रिकन महिलेच्या प्राथमिक तपासणीत हा उत्परिवर्तित विषाणू आढळला आहे. ही महिला गेल्या १० फेब्रुवारी रोजी भारतात आली. २७ फेब्रुवारी रोजी केलेल्या प्रयोगशाळा चाचणीत ती करोनाबाधित आढळली. त्यानंतर कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत तिला एक्सई उपप्रकाराची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यानंतर ‘जीआयएसएआयडी’च्या तपासणीतही हा उत्परिवर्तित विषआणू एक्सई असल्याचे आढळून आले. परंतु असे असले तरी या उत्परिवर्तित विषाणूची नि:संशय खात्री व्हावी यासाठी नमुन्यांचे पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रयोगशाळेत जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येणार आहे. विषाणूंच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून जनतेने घाबरू नये, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.