मुंबईतल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी आलं पाहिजे तरच त्यांना परमिट दिलं जाईल अन्यथा ते रद्द केलं जाईल अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली. मात्र केंद्रीय मंत्री तसंच एनडीएचे घटक असलेल्या रामदास आठवलेंनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मलाही मराठी भाषेवर गर्व आहे, पण मुंबईत देशभरातून लोक येतात. इथल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मराठीची सक्ती करणं योग्य नाही असं मला वाटतं असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं आहे.

काय म्हटलं आहे रामदास आठवलेंनी?

मला मराठी भाषेबाबत खूप गर्व आहे. तसंच मी हे देखील मानतो की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे. कारण मराठी भाषा ही आपल्या राज्याचा आत्मा आहे. तसंच आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. पण याबरोबरच हेदेखील लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई ही फक्त महाराष्ट्राची राजधानी असलेलं शहर नाही तर मुंबईला देशाची आर्थिक राजधानी असंही म्हटलं जातं. तसंच हे वेगाने प्रगती करणारं एक वैश्विक शहर आहे. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून इथे लोक येतातच. पण संपूर्ण जगभरातून लोक मुंबईत आपली स्वप्नं आणि रोजगार मिळेल या आशेने येत असतात. मुंबईची खरी ओळख आणि खरी ताकद ही इथली विविधता आहे. तसंच सगळ्यांना खुल्या दलाने आपलं मानण्याची क्षमता आहे.

स्थानिक भाषा येत नाही म्हणून रोजगार हिरावला जाता कामा नये-रामदास आठवले

रामदास आठवले पुढे म्हणाले की या वैश्विक समावेशकतेचा मुद्दा लक्षात घ्या. या ठिकाणी काम करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे सारखे कायदे करणं त्याची सक्ती करणं हे मला अयोग्य वाटतं. कुठल्याही गरीब माणसाचा रोजगार फक्त एवढ्यासाठी हिरावून घ्यायला नको की त्याला स्थानिक भाषा येत नाही. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा जरुर केला पाहिजे. पण रोजगारासाठी ही अट ठेवायला नको. भाषा ही लोकांना जोडण्याचं माध्यम असते त्यांचं विभाजन करण्याचं काम भाषा करत नाही. मुंबईत कुठलाही भाषिक भेदभाव केला जात नाही त्यामुळेच मुंबई हे भारतातलं महत्त्वाचं शहर आहे, त्याची प्रगती वेगाने होते आहे ही भूमिका रामदास आठवलेंनी घेतली आहे.

रामदास आठवले यांनी पोस्ट केल्याने आता त्यांनी महायुती सरकारच्या निर्णयालाच विरोध दर्शवला आहे का? या चर्चा सुरु झाल्या आहेत. मराठी भाषा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आली पाहिजे असं सरकारने सांगितलं होतं. त्यासाठी नियमावली आणि शिकवण्याही सुरु केल्या होत्या. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी किमान व्यवहारापुरती मराठी भाषा बोलावी यासाठी सरकार आग्रही आहे. अशात भाषा जोडण्याचं काम करते विभाजानाचं नाही असं म्हणत रामदास आठवलेंनी वेगळी भूमिका घेतली आहे. आता यावर काही प्रतिक्रिया येतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.