मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेलं आंदोलन ३० मेच्या रात्री १ नंतर मागे घेतलं आहे. तसंच सरकारशी आमची सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगेंना हिट स्ट्रोकचा त्रास झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली.

काय म्हणाले मनोज जरांगे?

राधाकृष्ण विखे पाटील ड्राफ्ट घेऊन आले होते. त्यावर दिवसभर चर्चा करण्यात आली. रात्रीही चर्चा करण्यात आली. आम्हाला सांगा आत्ता काही गोष्टी करायच्या असतील तर. पण सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत त्यामुळे त्या अभ्यासकांपुढे मसुदा ठेवला. समाजातले काही लोक होते त्यांनाही दाखवलं. त्यानंतर आम्ही दिलं आहे. सूचना आणि आदेश काढायचे आहेत तर हो म्हटलं आहे. सोमवारपासून सगळं काम सुरु होईल. त्यासाठी महिन्याभरासाठी मुदत दिली आहे. समजा एक महिन्याच्या मुदतीनंतर गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत तर आंदोलन करायला मी मोकळा आहे परत. चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला तो असतो हे लक्षात घ्या. सारखं लढावं लागतं तेव्हा गोष्टी मार्गी लागतात. दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या मुद्यावरुन सरकारवर टीका केली होती. त्याबाबत प्रश्न विचारला असता विजय वडेट्टीवार यांना मनोज जरांगेंनी खडे बोल सुनावले.

Manoj Jarange
मनोज जरांगेंनी अखेर त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. (फोटो-संग्रहीत)

विजय वडेट्टीवार यांच्याबाबत काय म्हणाले जरांगे?

“सरकार ते वडेट्टीवार डबल ढोलकी म्हणतंय, ते काय एकेरी ढोलकी आहे का? तुमची सत्ता होती तेव्हा कुठे गेला होतात? ओबीसी किंवा मराठा यांचं कल्याण केलं का? ओबीसींना काय पाळणा बांधून दिला होता का तेव्हा? काहीही बोलायचं उगाच. तुम्ही काय धड आहात काय? ओबीसीला यांनी झोका बांधून दिला नाही, मराठ्यांना पाळणा बांधून दिला नाही. ओबीसी असो की मराठे सगळ्यांनी मिळून सरकारविरोधात झुंजलं पाहिजे. ते आपल्यांतच वाद लावून देतात आणि आपण सुरु होतो. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा काय झालं? तेव्हा काय मराठ्यांना फुटाणे वाटले का तुम्ही? काँग्रेसने तुझ्यासारख्या नेत्याचा भरणा केला. आता काय काँग्रेसने संपायचं का तुझ्यासारख्या नेत्यामुळे? जो कायमच मराठ्यांच्या विरोधात बोलतो?” असा सवालही जरांगेंनी केला. काँग्रेस सरकारनेही मराठ्यांचं वाटोळं केलं आणि महायुतीनेही केलं असंही विधान मनोज जरांगेंनी केलं. मराठा ओबीसींनी समजून घेतलं पाहिजे की दोघांनी मिळून सरकारच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे.

ओबीसी आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही-जरांगे

ओबीसी आरक्षणाला मुख्यमंत्री असोत किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असोत धक्का लावणार नाही असंच म्हणाले आहेत. आम्ही कुठे म्हणतोय त्यांना धक्का लावा. सरकार आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण देते आहे. त्यांना धक्काही लावू नका आणि ढकलूही नका. आमच्या नोंदी ते देत आहेत. आमच्या लेकरांचं कल्याण होणार आहे, त्यांचं कुठे काय काढून घेत आहेत? असंही जरांगेंनी म्हटलं आहे. मला वाटलं होतं की बदल झाला पाहिजे. त्यामुळे परळीचा तोच म्हणाला होता की माझं ब्रेन मॅपिंग करा. माझा घातपात करण्यामागे कोण होतं? याचा पुन्हा तपासझाला पाहिजे अशीही माझी मागणी आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत. धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट झाली पाहिजे. संतोष देशमुख, महादेव मुंडे सगळे विषय एकदाच बाहेर येतील. माझ्यावर जो हल्ला झाला होता त्याचेही तपशील समोर आले पाहिजेच. तुझ्याकडे (धनंजय मुंडे) आता मी बघूनच घेतो. असंही जरांगेंनी म्हटलं आहे. प्रकरणाचा सीआयडीपासून एसआयटीपर्यंत परत तपास झाला पाहिजे. त्या आरोपीच्या संपर्कात कोण होतं? कोण प्रत्यक्ष बोलत होतं? कोण समोर जाऊन बोलत होतं? याचा तपास झाला पाहिजे. परळीचा नेता यात कसा नाही? रश्मी शुक्ला या महासंचालक होत्या. तेव्हा रश्मी शुक्ला, अजितदादा आणि फडणवीस हे नागपूरला बसले होते. त्यावेळी त्याचं नाव बाहेर काढलं. मी आता तो विषय लावून धरणार आहे. त्याची आणि माझी आणि त्या तीन आरोपींची नार्को टेस्ट करायला लावणार आहे. माझ्या प्रकरणात तो नेमका काय करणार होता? करणाऱ्यापेक्षा करून घेणारा महत्त्वाचा आहे. तो मागे राहतो आणि घोडे नाचवल्यासारखं नाचवतो, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये मनोज जरांगेंनी काय आरोप केला होता?

मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला होता आणि तो संपूर्ण कटाचा “मास्टरमाइंड” होता, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. जरांगे पाटील यांनी दावा केला की मुंडे यांनी आरोपींसोबत बैठका घेतल्या होत्या. बीड आणि जालना जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी हे स्वतःच्या कानांनी ऐकले आहे