सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोलझर आणि झोळंबे परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः नारळाच्या बागांमध्ये हत्तींकडून मोठ्या प्रमाणावर नासधूस केली जात असल्याने स्थानिक बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने ‘हत्ती पकड’ मोहीम राबवून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे, मात्र अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ‘ओंकार’ नावाच्या उपद्रवी हत्तीला पकडण्याचे आदेश दिले होते, परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी न झाल्याने माजी शिक्षणमंत्री आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांच्यावर हत्ती पकड मोहिमेत दिरंगाई केल्याचा आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी केली होती.
विशेष म्हणजे, आमदार केसरकर यांच्या मागणीनंतर मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांची तातडीने बदली करण्यात आली. त्यांच्यासोबतच सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांचीही बदली झाली. आमदार केसरकर यांच्या एका मागणीमुळे दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी, जमिनीवरील वास्तव मात्र बदललेले नाही. हत्तींचा उपद्रव अजूनही सुरूच आहे.
सिंधुदुर्गचे नवे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी पदभार स्वीकारला असला तरी, ते बहुतेक वेळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येच व्यस्त असतात अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे ‘हत्ती हटाव’ मोहीम राबवण्याऐवजी ‘अधिकारी हटाव’ मोहीम राबवून हा प्रश्न सुटला आहे का, असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. या प्रश्नाचे उत्तर वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.