सावंतवाडी : तब्बल ९ वर्षांच्या कालावधीनंतर आयोजित करण्यात आलेली दोडामार्ग तालुका आमसभा सुरुवातीलाच घडलेल्या राजकीय गोंधळामुळे वादग्रस्त ठरली. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत, बैठक व्यवस्थेबाबत प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी रविकिरण गवस यांच्यावर सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चाल करून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवसेना व विरोधकांमध्ये सुमारे १५ मिनिटे जोरदार गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
घडलेल्या या प्रकाराबाबत आमदार दीपक केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, विरोधकांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत हा लोकशाहीचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
गोंधळ शांत झाल्यानंतर सुरू झालेल्या या सभेत तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी वन कर्मचारी पैशांची मागणी करतात, असा गंभीर आरोप भाजप चिटणीस सुधीर दळवी यांनी केला. यावर वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांना हे प्रकार तातडीने थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयासाठी विनामूल्य जागा देऊनही स्थानिकांना नोकरी मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर नवीन उपजिल्हा रुग्णालयात उपहारगृह चालवण्यास देण्याबाबत चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले. तसेच पुढील दोन महिन्यांत नवीन उपजिल्हा रुग्णालय सुरू होऊन नवीन डॉक्टरांची टीम रुजू होईल, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
महावितरण व बांधकाम विभागावर ताशेरे: महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्याची तातडीने बदली करण्याचे निर्देश आमदारांनी दिले. तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वर्तवणुकीबाबत प्राप्त तक्रारींवर आवश्यक सूचना देण्यात आल्या.
दोडामार्ग ते विजघर रस्त्याची दुरवस्था गणेशोत्सवापूर्वी सुधारण्याचे आदेश देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पडवे-माजगाव, तळकट-कोलझर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात आले.
तिलारी धरणाच्या बोगद्यातून पाणीपुरवठा योजना राबवल्यास अनेक गावे वीज बिलाशिवाय पाणीटंचाईमुक्त होतील, असा प्रस्ताव मांडण्यात आला. यावर जीवन प्राधिकरणासोबत बैठक घेण्याचे ठरले. तसेच बागायतींचे नुकसान टाळण्यासाठी तिलारी कालव्याची दुरुस्ती गणेशोत्सवानंतर सुरू करण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले.
तहसील कार्यालयातील बंद शौचालयासाठी आमदार निधीतून २ लाख रुपयांची विंधन विहीर मंजूर करण्यात आली. याशिवाय मांगेली धबधब्यावरील बेकायदेशीर पार्किंगची चौकशी, तालुक्यातील अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई, आडाळी औद्योगिक क्षेत्रातील खनिज चोरी आणि सासोली जमीन विषय यावरही चर्चा झाली. या सभेस आमदार दीपक केसरकर यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, तहसीलदार राहुल गुरव, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध खात्यांचे अधिकारी, सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
