सावंतवाडी: दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथे पारंपरिक शिमगोत्सवाची सांगता यंदा एका वेगळ्या आणि विधायक संकल्पाने झाली. गावचे अस्तित्व, जल आणि जंगल टिकवण्यासाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या पर्यावरण रक्षण चळवळीला यश मिळावे, यासाठी ग्रामदैवतासमोर सामूहिक साकडे घालण्यात आले.
कोलझर परिसरात गेल्या काही काळापासून बाहेरील गुंतवणूकदारांकडून स्थानिकांना विश्वासात न घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि अवैध उत्खनन सुरू होते. ग्रामस्थांच्या खासगी जमिनींवर अतिक्रमण करून निसर्गाचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न झाला. या विरोधात संपूर्ण गावाने एकजूट दाखवत ‘गावची जमीन विकणार नाही’ असा ठाम निर्णय घेतला आहे. या भूमिकेचे राज्यभरात कौतुक झाले होते. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या शिमगोत्सवातही निसर्ग रक्षणाचे प्रतिबिंब उमटले.
पर्यावरण रक्षणासाठी ‘ गाऱ्हाणे ‘
कोलझर येथील सात दिवसांच्या उत्सवाचा मुख्य सांगता सोहळा ११ मार्च ला पार पडला. उत्सवातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘न्हावाण’ (तीर्थ) सोहळ्याप्रसंगी चाकरमानी आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी ग्रामस्थांच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण गाऱ्हाणे घातले. “पिढ्यानपिढ्या जतन केलेले आमचे जंगल आणि पाण्याचे झरे सुरक्षित राहावेत. पर्यावरणावर घाला घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी गावाला बळ मिळावे आणि गावचा हा संकल्प अधिक मजबूत व्हावा,” अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
वन्यप्राण्यांच्या त्रासातून मुक्तीची प्रार्थना
निसर्ग संवर्धनासोबतच, गावात हत्ती व इतर वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान टळावे आणि संपूर्ण गावाला सुख-समृद्धी लाभावी, अशी मागणीही यावेळी दैवताकडे करण्यात आली. निसर्ग रक्षणाची ही किनार लाभल्यामुळे कोलझरचा यंदाचा शिमगोत्सव संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
