सावंतवाडी: दोडामार्ग तालुक्यातील तीन जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समिती जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीने निर्विवाद विजय मिळवला आहे. पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलेला विजयाचा विश्वास या निकालाने सार्थ ठरवला असून, ठाकरे शिवसेनेला या निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

​माटणे मतदारसंघ: भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात महायुतीचे दीपक गवस ३,७७१ मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी अपक्ष बंडखोर उमेदवार राजेंद्र म्हापसेकर यांचा पराभव केला. म्हापसेकर यांना २,०९१ मते मिळाली, तर ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

​साटेली भेडशी मतदारसंघ: महायुतीच्या उमेदवार श्वेता सूर्यकांत धर्णे ५,३१२ मतांच्या प्रचंड फरकाने विजयी झाल्या. त्यांनी पहिल्या फेरीपासूनच आपली आघाडी कायम राखली होती. ​मणेरी मतदारसंघ: या मतदारसंघात महायुतीच्या साक्षी तळवडेकर यांनी विजय मिळवला. त्यांनी अपक्ष उमेदवार सुनीता भिसे यांचा पराभव केला.

पंचायत समिती निकाल:

​कोनाळ: महायुतीच्या सायली निंबाळकर यांनी अपक्ष उमेदवार साक्षी देसाई यांच्यावर मात करत विजय मिळवला.
​मणेरी: महायुतीच्या सोनिया कुबल यांनी प्रीती बाबुराव धुरी यांचा पराभव केला.
​झरेबांबर: महायुतीच्या स्नेहा संजय गवस विजयी झाल्या.
​माटणे: महायुतीच्या पार्वती गवस विजयी झाल्या.
​साटेली भेडशी: येथे संजय सातार्डेकर यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.
​कोलझर: या मतदारसंघातून गणेशप्रसाद गवस हे आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.

​ठाकरे सेनेची पिछेहाट:

या निवडणुकीत ठाकरे सेनेच्या उमेदवारांना पक्षाकडून प्रचारात हवी तशी मदत मिळाली नसल्याने त्यांचा दारुण पराभव झाला. तालुक्यातील सर्व प्रमुख जागांवर महायुतीने कब्जा केल्यामुळे राजकीय वर्तुळात महायुतीचा बोलबाला पाहायला मिळत आहे.