शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा एकदा फूट पडल्याच्या बातम्या येत आहेत. उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला सहा खासदार अनुपस्थित होते अशीही माहिती समोर येते आहे. उद्धव ठाकरेंनी लागू केलेला व्हिप या खासदारांना लागू होतो की नाही याबाबत ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले उज्वल निकम?

कायद्याचा अभ्यासक म्हणून मी हे सांगू इच्छितो की उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांची पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती होती. लोकसभेच्या अध्यक्षांकडे त्यांनी पत्र दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे एकूण ९ खासदार आहेत त्यापैकी ६ खासदारांनी पत्र देऊन वेगळा गट स्थापन करण्याची मागणी करत आहेत असं माध्यमांकडून आलेल्या बातम्यांमधून कळतं आहे. हे सहा खासदार आपल्या पक्षातून राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेले आहेत का? किंवा दुसऱ्या पक्षात गेले असतील तरीही अपात्रतेची कारवाई लागू होत नाही. १० व्या परिशिष्टानुसार अपात्रातचेी कारवाई दोन मुद्द्यांवर लागू होते. एक म्हणजे पक्ष नेतृत्वाचा व्हीप असतो त्याचं उल्लंघन केल्यास अपात्रता लागू होतो. जर दोन तृतीयांश पेक्षा जास्त असलेले प्रतिनिधी दुसऱ्या पक्षात सहभागी होत असतील तर ते अपात्र ठरत नाहीत. अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली.

उद्धव ठाकरेंकडून व्हीप निघेपर्यंत खासदार दुसऱ्या पक्षात गेले असतील तर…

उज्वल निकम पुढे म्हणाले, अद्याप याबाबतीत आजचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा व्हीप निघेपर्यंत हे सहा खासदार दुसऱ्या पक्षा गेले आहेत की नाही?याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या सहा खासदारांनीही आपण शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सोडला आहे असंही कुठे म्हटलेलं नाही. याचा अर्थ असा होतो की हे सहा खासदार अजूनही आपण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात आहोत असं मानतात. असं जर का ते मानत असतील तर त्यांना उद्धव ठाकरेंचा व्हिप लागू होतो. त्यातही मेख अशी आहे की या सहा खासदारांनी हा व्हिप निघण्याच्या आधीच लोकसभेच्या अध्यक्षांना भेटून त्यांच्याकडे मागणी केली असेल की आमचा गट वेगळा आहे, स्वतंत्र संमती द्यावी आणि आम्हाला वेगळा व्हिप काढण्याचा अधिकार असावा अशी मागणी जर केली असेल तर मात्र व्हिप कुणाचा लागू होणार यावर रणकंदन होऊ शकतं. या सहा खासदारांनी नेता निवडला आहे का? उद्धव ठाकरेंचा व्हिप निघण्याआधी हे खासदार दुसऱ्या पक्षात गेलेत का? तसंच लोकसभेच्या अध्यक्षांकडे यांनी काय मागणी केली आहे? हे तिन्ही प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत. जर ते उद्धव ठाकरेंच्या पक्षात आहे तर त्यांना उद्धव ठाकरेंचा व्हिप लागू होईल. पण ते या पक्षात नसतील तर व्हिप कुणाला काढण्याचा अधिकार इथून कायदेशीर लढाई सुरु होईल. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी हे भाष्य केलं आहे.

लोकसभा अध्यक्षांनी त्यांना मान्यता दिली आहे का?

हा निर्णय कोण घेणार? याबाबत विचारले असता उज्ज्वल निकम म्हणाले की, “या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे काय मागणी केली आहे, त्यांनी आपला नेता निवडला आहे का, लोकसभा अध्यक्षांनी त्यांना मान्यता दिली आहे का, त्यांनी काही वेगळा व्हीप काढलेला आहे का? या सर्वांचे उत्तर मिळाल्याशिवाय आजच्या ठाकरे गटाच्या व्हिपला किती महत्त्व आहे याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही.” पक्षाच्या व्हीपच्या कायदेशीर महत्त्वाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की, “कोणताही पक्ष असू द्या, त्या पक्षातर्फे व्हीप काढला जातो तो व्हीप बंधनकारक असतो. उबाठा पक्षाने काढलेल्या व्हीपला नक्कीच कायदेशीर महत्त्व आहे. पण या सहा खासदारांनी नेमकी काय खेळी खेळली आहे? हे बघणे देखील रंजक ठरणार आहे. सहा खासदारांनी त्यांच्या कायदेशीर सल्लागारांच्या सल्ल्यानुसार कोणती पावले उचलली हे बघणे महत्त्वाचे ठरेल,” असे देखील उज्ज्वल निकम म्हणाले. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात आणि हे ६ खासदार कायदेशीर लढाई कशी लढतात? यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.

ठाकरेंचे कोणकोणते खासदार बैठकीत अनुपस्थित

  1. संजय जाधव
  2. संजय देशमुख
  3. नागेश पाटील आष्टीकर
  4. ओमराजे निंबाळकर
  5. भाऊसाहेब वाकचौरे
  6. संजय दिना पाटील