पुण्याच्या गणेशोत्सवाला सुरुवात होण्याआधीच DJ, लाऊडस्पीकर, ढोल-ताशे, मिरवणुकीचे मार्ग आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली आहे. या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी सध्या आहेत विद्यानंद बापट. गणेशोत्सवातील DJ आणि मोठ्या आवाजाला त्यांचा विरोध का आहे? पारंपरिक ढोल-ताशांबद्दल त्यांची भूमिका नेमकी काय आहे? तसंच मशिदींवरच्या भोंग्याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगितलं आहे.

विद्यानंद बापट मशिदींच्या भोंग्याबाबत नेमकं काय म्हणाले?

विद्यानंद बापट यांना विचारण्यात आलं की डी.जे. किंवा स्पीकर्सचा जसा त्रास होतो मग मशिदींच्या भोंग्याबाबत तुमची भूमिका काय विचारलं गेलं. त्यावर विद्यानंद बापट म्हणाले, ही मुळात एक लॉजिकल फॅलसी आहे. मराठीत एक म्हण आहे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारणं योग्य नाही. याचाच अर्थ टीकेला टीकेने उत्तर देणं. तुम्ही एखादी कृती करता आहात तर ती चुकीची आहे हे सांगण्यासाठी दुसरी चूक करणं. त्यामुळे तुम्ही जे करत आहात ते योग्य कसं ठरतं. एखाद्याने खून केला आहे आणि तो जर दुसऱ्याला म्हणत असेल की तू खून केला तर त्याने केलेला खून कसा काय योग्य ठरतो. हे सगळे भिन्न मुद्दे आहेत. एक चूक दाखवून दुसरी चूक जस्टिफाय होत नाही. मशिदींच्या भोंग्यावर आक्षेप नाही असं नाहीच. त्या मुद्द्यावर बऱ्याचश्या याचिका दाखल झाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्याबाबत निर्णय दिला आहे. मशिदींवरच नाही तर सगळ्याच धार्मिक स्थळांवर ही बंदी आहे. तसंच मुस्लिम समाजाने मस्जिद अजान नावाचं अॅप तयार केलंय. त्यावर त्याचे अपडेट्स दिसतात त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाही. मी सर्वांगिणच खंडन केलं आहे. त्यामुळे माझ्यावर जो आरोप केला जातो की मशिदीवरचे भोंगे आणि त्यावरुन होणाऱ्या आरोपांचं मी पुरेसं खंडन केलं आहे असं उत्तर विद्यानंद बापट यांनी दिलं आहे. लगाव बत्ती या पॉडकास्टला विद्यानंद बापट यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत विद्यानंद बापट यांनी ही भूमिका घेतली आहे.

कुठल्याच प्रकारचं ध्वनी प्रदूषण होता कामा नये-विद्यानंद बापट

ध्वनी प्रदूषण कुठल्याही प्रकारचं नको. म्हणजेच डीजे नसावेत, फटाके नसावेत, ढोल ताशेही नकोत. एमपीसीबीकडून दिवाळीतच फटाक्यांच्या आवाजाचं ध्वनी प्रदूषण होतं असं समजत होते. दोन वर्षांपूर्वी कोर्टाने आदेश दिल्यानंतर ते गणपतीतलंही ध्वनी प्रदूषण मोजायला लागले. पण ते देखील उत्सवाच्या दिवसांतच मोजलं जातं. पण मिरवणुकांमध्ये मोजत नाहीत किंवा आता ते मोजू लागलेत असं मी ऐकलं आहे. आम्हाला कुठल्याच प्रकारचं ध्वनी प्रदूषण नको आहे असं विद्यानंद बापट यांनी स्पष्ट केलं आहे.

ढोल ताशे प्रथा ही बंदच केली पाहिजे-बापट

तुमचा पारंपारिक वाद्यांनाही विरोध आहे का? असं विचारलं असता विद्यानंद बापट म्हणाले, “प्रश्नच येत नाही. कारण परंपरा असली तरीही मोटरयाकलचे हॉर्न, सायलेन्सरचे आवाज, ढोल ताशे, डीजे, लाऊड स्पीकर्स सगळे समान पातळीवरचे आहेत. धार्मिक प्रवृत्तीचे लोक असं समर्थन करु इच्छित आहेत की लाऊड स्पीकर हा उत्सवाचा भाग नाही. परंपरा आहे म्हणून एखादी गोष्ट तशीच सुरु ठेवावी याला काय अर्थ आहे? सतीची प्रथा महाभारत काळापासून सुरु होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात लॉर्ड बेटिंगने बंद केली. बालविवाहाची प्रथाही मुघलांच्या काळात होती. मुंजीच्या आधी लग्न होती. आपण संमती वयाचा कायदा आणून ती प्रथा बंद केली. बहुभार्या पद्धती होती ती आपण बंद केली. प्रथा आहे म्हणून मुलभूत मानवी हक्कांवर गदा येते आहे तरीही सुरु ठेवायची का? तर त्याचं उत्तर नाहीच येतं. असं अनेक प्रथांबाबत होतं. ढोल ताशांमुळे जर मानवी शांततेच्या हक्काचं उल्लंघन होताना दिसतं आहे तर लाखो वर्षांपूर्वी अगदी होमो इरेक्टसच्या काळातली प्रथा असेल तरीही ती बंद केलीच पाहिजे.” असं मत विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.