बिबटय़ाच्या तावडीतील शेतक-यास कुत्र्यांनी वाचवले

भक्ष्याच्या शोधात भरकटलेल्या बिबटय़ाने शेळय़ा चरवण्यास गेलेल्या शेतक-यावर झडप घालून त्याचे भक्ष करण्याचा प्रयत्न चालवला असतानाच, पाळीव कुत्र्यांनी बिबटय़ावर जोरदार हल्ला चढवून त्यास पिटाळल्याची थरारक घटना कराड तालुक्यातील बांदेकरवाडी-सवादे येथील शिंदेद-या डोंगरावर गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

भक्ष्याच्या शोधात भरकटलेल्या बिबटय़ाने शेळय़ा चरवण्यास गेलेल्या शेतक-यावर झडप घालून त्याचे भक्ष करण्याचा प्रयत्न चालवला असतानाच, पाळीव कुत्र्यांनी बिबटय़ावर जोरदार हल्ला चढवून त्यास पिटाळल्याची थरारक घटना कराड तालुक्यातील बांदेकरवाडी-सवादे येथील शिंदेद-या डोंगरावर गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. महादेव बांदेकर (वय ५६) हे बिबटय़ाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा बिबटय़ा पाठरवाडी येथून लटकेवाडीच्या डोंगरातून आला असावा. तो बिथरला असावा, त्यास डिवचण्याचा प्रयत्न कोणी करू नये. बिबटय़ा दिसल्यास वनखात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वनक्षेत्रपाल भरत पाटील यांनी केले आहे.
बांदेकरवाडी येथील गुऱ्हाळघराच्या मागील बाजूस असणा-या गावालगतच्या शिंदेद-या या डोंगरीभागात बाळाराम मारूती बांदेकर हे नेहमीप्रमाणे आपल्या शेळय़ा चरवण्यासाठी घेऊन निघाले होते. या वेळी त्यांना लिंबाच्या झाडावर बिबटय़ा असल्याचे आढळले. तेव्हा त्यांनी घाबरून आपल्या शेळय़ांसह गाववस्तीकडे धाव घेतली. मात्र, त्यांच्या सोबतीच्या ५ कुत्र्यांनी बिबटय़ा बसलेल्या झाडाला वेढा दिला. दरम्यान, ही वार्ता समजताच ग्रामस्थांनीही बिबटय़ाच्या दिशेने धाव घेतली. लोकांचा जमाव आणि कुत्र्यांचे भुंकणे यामुळे बिबटय़ाने डोंगराच्या दिशेने धूम ठोकली. मात्र, कुत्र्यांनी बिबटय़ाचा पाठलाग केला. यावर हा बिबटय़ा जांभळीच्या झाडाचा आश्रय घेऊन राहिला. झाडाला कुत्र्यांनी घेरल्याने हा बिबटय़ा अर्धा तास जांभळीच्या झाडावर अडकून राहिला होता. कुत्र्यांच्या तावडीतून निसटून पळण्याची त्याची धडपड होती. मात्र, झाडाखाली असलेल्या कुत्र्यांमुळे तो झाडावरच खिळून राहिला. या एकंदर एक तासाच्या थरारनाटय़ानंतर अखेर बिबटय़ाने खाली उतरत पाचही कुत्र्यांवर हल्ला चढवला व दुस-या झाडावर झेप घेतली. तरीही, या कुत्र्यांच्या कळपाने बिबटय़ाचा पाठलाग सोडला नाही. बिबटय़ा व कुत्र्यांमध्ये थरारक हल्ला-प्रतिहल्ला अडीच तास सुरू होता. हे थरारनाटय़ पाहण्यासाठी सुमारे तीनशेवर ग्रामस्थ जमले होते. अखेर नजीकच्या शिंदेद-या जवळील डोंगरपठारावर झाडावरून बिबटय़ा कुत्र्यांच्या तावडीतून निसटून जाण्याच्या बेतात असताना, मोकळय़ा पठारावर पाचही कुत्र्यांनी बिबटय़ाला घेरून त्यावर हल्ला चढवला. बिबटय़ानेही प्रतिहल्ला करत पाचपैकी तीन कुत्र्यांना चांगलीच इजा पोहोचवली. तेथेच डोंगरावर बिबटय़ा व कुत्र्यांमधील चित्तथरारक हल्ले-प्रतिहल्ले पहात असलेल्या महादेव बांदेकर यांच्या दिशेने बिबटय़ाने अचानक हल्ला चढवला. त्यात बांदेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही झटापट सुरू असतानाच, बांदेकर यांच्या कुत्र्यांनी बिबटय़ावर जोरदार हल्ला चढवल्याने बांदेकर सुदैवाने बचावले. त्यांना उंडाळे येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर बिबटय़ा घटनास्थळावरील झुडपात लपून बसला होता. कुत्री डोंगरावरून खाली आल्यानंतर बिबटय़ाने तेथून टाळगावच्या दिशेने पळ काढला. सुमारे अडीच तास चाललेली ही थरारक घटना प्रत्यक्ष पाहिल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी महादेव बांदेकर यांची आमदार विलासराव उंडाळकर, वनक्षेत्रपाल भरत पाटील, बाबुराव कदम, सुभाष पाटील, डॉ. सुधीर कुंभार यांनी भेट घेऊन विचारपूस केली. या बिबटय़ाची छायाचित्रे व्यावसायिक छायाचित्रकार प्रसाद पाटील यांनी मोठय़ा धाडसाने अगदी २० फुटांवरून घेतली आहेत. त्यांच्या धाडसाची चर्चा असून, हा बिबटय़ा डेळेवाडी येथील मादीपासून झालेले पिल्लू असावे, वास्तव्यासाठी जागा शोधताना अथवा भक्ष्याच्या शोधार्थ हा बिबटय़ा भरकटला असावा असे वनखात्याचे म्हणणे आहे. तर, कालच लटकेवाडीत तीन बिबटे दिसल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बिबटय़ांच्या या नागरी वस्तीजवळील वावरामुळे लोकांत भीतीचे वातावरण आहे.
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dog saved farmer from leopard