scorecardresearch

“फुटीर आमदारांच्या घरातल्या कुत्रे -मांजरींना वाय प्लस सुरक्षा, पण माझ्यासारख्या…” संजय राऊत यांचा खोचक टोला

सुरक्षा काढल्याच्या मुद्द्यावर राजन विचारे यांनी कोर्टात धाव घेतली आहे, त्याविषयीचा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे

“फुटीर आमदारांच्या घरातल्या कुत्रे -मांजरींना वाय प्लस सुरक्षा, पण माझ्यासारख्या…” संजय राऊत यांचा खोचक टोला
Dogs and cats in the house of 40 Rebel MLAs have Y Plus security, but the security of a leader like me has been removed Says Sanjay Raut


आमच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. मात्र चाळीस जे फुटीर आमदार आहेत त्यांच्या कुत्र्यांना आणि मांजरांनाही वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. राजन विचारे यांनी यासंदर्भात जे मुद्दे हायकोर्टात उपस्थित केले आहेत ते योग्यच आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
माझ्यासारख्या नेत्याची सुरक्षा पूर्ण काढली आहे. कोणत्या नियमाने ती सुरक्षा काढली. आमच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. मात्र जे फुटीर आमदार आहेत त्यांच्या घरातल्या कुत्र्यांना आणि मांजरांनाही वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. हे सगळं कोणत्या नियमाने सुरू आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. मी जी माहिती घेतली त्यात फुटीर आमदारांना एकेकाला चाळीस सुरक्षा रक्षक आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे नोकर, त्यांच्या घरातले कुत्रे, मांजरी यांनाही सुरक्षा प्रदान कऱण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातली सुरक्षा पाहिली की मला प्रश्न पडतो कारण एवढी फौज देशाच्या सीमेवर किंवा चौकीतही नाही. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजन विचारेंचा मुद्दा योग्यच आहे.

राजन विचारे यांनी काय भूमिका घेतली आहे?
कोणत्याही ठोस कारणाशिवाय सुरक्षा कमी करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात राजन विचारे कोर्टात गेले आहेत. तसंच आपली सुरक्षा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाकरे गटाशी संबंधित खासदार-आमदारांना धमकवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे. राज्य सरकार राज्यातील राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहे, असा आरोपही विचारे यांनी याचिकेद्वारे केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकीकडे खासगी वैयक्तिक सहाय्यक, पक्षाचे कार्यकर्ते, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या खास व्यक्ती तसेच कोणतेही राजकीय पद नसलेल्यांना सरकारी खर्चाने दुप्पट पोलीस सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेत्यांची सुरक्षा कमी केली जात असल्याचा दावा विचारे यांनी याचिकेत केला आहे.

राजन विचारे यांनी जे पाऊल उचललं आहे त्याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी राजन विचारेंची भूमिका योग्यच असल्याचं म्हटलं आहे. तसंच शिंदे गटातल्या कुत्रे, मांजरांनाही सुरक्षा पुरवण्यात आल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 18:23 IST

संबंधित बातम्या