Ramesh Mhatre Dombivli Doctor Assault Case: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेनेचे (शिंदे) नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि दोन परिचारिकांना जबर मारहाण केली. यात एक महिला डॉक्टर, दोन परिचारिका आणि एका डॉक्टराचा समावेश आहे. यावेळी त्यांनी परिचारिका आणि डॉक्टरांना जिवे मारण्याचीही धमकी दिली होती, असा आरोप करण्यात येत आहे. या घटनेचे पडसाद आता विधानसभेत उमटले असून शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी हा विषय सभागृहात उचलून धरला.
आदित्य ठाकरे यांनी सभागृहात हा विषय मांडला. ते म्हणाले, ६ जुलै रोजी डोंबिवलीच्या शास्त्री नगर रुग्णालयात गर्भवती महिला गेली असताना तिची तपासणी करण्यात आली. मुदतीआधी प्रसूती होण्याची शक्यता असल्यामुळे सदर रुग्णाला इतर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यावेळी कुणीतरी तिथल्या नगरसेवकांना बोलवून घेतले. नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी तिथल्या डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केली.
“डॉक्टर आणि परिचारिकांना जर अशाप्रकारे मारहाण होत असेल आणि त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असेल तर योग्य नाही. इतर रुग्णांना त्याचा फटका बसेल. मुख्यमंत्र्यांकडून या विषयावर निवेदन करण्यात यावे. तसेच त्या नगरसेवकाचे पद बरखास्त करण्यात यावे”, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका
“करोना काळात पांढऱ्या कपड्यातील देवदूतांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यातील लोकांचे जीव वाचवले होते. फडणवीसांनी डॉक्टरांना शुभ्र कपड्यातील देवदूत अशी उपमा दिली होती. मात्र त्या देवदूतांना डोंबिवलीतील गुंडानी मारहाण केली. हे गुंड एका राजकीय पक्षाचे नगरसेवक आहेत. तुम्ही महिलांना आरक्षण द्यायला निघाला आहात, पण त्याच महिलांवर तुम्ही हात टाकता. या प्रकरणात कारवाई करता येत नसेल तर मंत्रालयातील गृह खात्याच्या कार्यालयाची पूजा करा”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
WHEN A RULING PARTY BECOMES DRUNK ON THE INTOXICANT OF POWER AND ENTITLEMENT.
— Rahul Shivshankar (@RShivshankar) July 7, 2026
Shiv Sena (Shinde faction) corporator Ramesh Mhatre allegedly assaulted a female doctor, a gynecologist, and multiple nursing staff members at the Kalyan-Dombivli Municipal Corporation (KDMC)-run… pic.twitter.com/LeCX0zETle
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावे. गृह खाते मी चालवत नसून कुणीतरी दिल्लीतून चालवत आहे आणि दिल्लीतील संबंधित लोक गुंडगिरीला पाठिशी घालत आहेत, हे फडणवीस यांनी समोर येऊन सांगायला हवे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
मी फक्त हातावर मारलं – रमेश म्हात्रे
डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी महिला डॉक्टरवर हात उचलल्याचा आरोप फेटाळून लावला. रुग्णाच्या नातेवाईकांची तक्रार ऐकण्याऐवजी डॉक्टर दूरध्वनीवर बोलत असल्याने तिच्या हातावर फटका मारल्याचे त्यांनी सांगितले. महिला डॉक्टरला मुलीसारखे मानत असून महिलांवर हात उचलण्याची शिकवण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
