“गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांना करोना चाचणीची सक्ती करू नका”, अशा सूचना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. एकीकडे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रशासनाकडून करोना चाचणीचा अहवाल किंवा दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेलं असताना दुसरीकडे भास्कर जाधव यांनी दिलेल्या या सूचनांमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याचसोबत, कोकणात आल्यावर काही अडचण आल्यास थेट संपर्क साधण्याचं आवाहन देखील भास्कर जाधव यांनी यावेळी केलं आहे.

“मुंबईत करोना संसर्गाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे, तिथून येणाऱ्यांमुळे करोना संसर्ग वाढणार नाही”, असं देखील यावेळी भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. “गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचं मी स्वागत करतो. या चाकरमान्यांना कोकणात येताना कुठेही रस्त्यात थांबवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी किंवा अँटिजीन चाचणी केली जाणार नाही. त्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा पिळवणूक केली जाणार नाही. याबाबतची स्पष्ट चर्चा स्थानिक जिल्हा प्रशासनाशी करण्यात आलेली आहे”, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं राजकीय पक्षांना आवाहन

“करोना परत वाढतो आहे. येणारे दिवस आव्हानात्मक असतील त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन होणं आवश्यक आहे. ही सर्व राजकीय पक्षांची प्रमुख जबाबदारी आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तर, मुंबईत गणेशोत्सव काळात नाईट कर्फ्यू लावण्याबाबत राज्य टास्क फोर्ससोबत चर्चा करून लवकरच निर्णय होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.