सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जातीय आरक्षणाचा फेरआढावा घेण्याच्या सूचनेवरून राजकीय वातावरण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील संघाला लक्ष्य करताना समाजात कटुता निर्माण होईल, असे विषय संघाने मांडू नये, असा सल्ला दिला.
शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज येथे पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात मोहन भागवत यांच्या जातीय आरक्षण संदर्भातील व्यक्तव्याला घटनेतील हस्तक्षेप, असे संबोधले आणि हा हस्तक्षेप देश सहन करणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत केल्या जात असलेल्या कारवाई संदर्भात पवार म्हणाले, ही कारवाई न्यायाने होताना दिसत नाही. महाराष्ट्र सदनासारखे उत्तम सदन दिल्लीत कोणत्याही दुसऱ्या राज्याचे नाही, हे सगळेच मान्य करतात, परंतु या सदनाचे कौतुक तर सोडाच त्यातील भलत्याच गोष्टी उरकून काढण्यात येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस बिहारमध्ये अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा करीत आहे, या प्रश्नावर ते म्हणाले, लालुप्रसाद, मुलायमसिंग यांच्याशी मिळून निवडणूक लढण्याचा विचार सुरू होता, परंतु नितीशकुमार यांनी आमच्याशी चर्चा न करताच जागा वाटपाचा निर्णय घेतला.