‘लहान मुले संवेदशील असतात. ती पालकांचे निरीक्षण करत असतात. पालकांच्या प्रत्येक कृतीचा त्यांच्या मनावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना असुरक्षित वाटेल किंवा त्यांच्या मनात तणाव निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य न करण्याचा संकल्प प्रत्येक पालकाने केला पाहिजे’, असे मत पुणे येथील पालकनीती संस्थेच्या विश्वस्त शुभदा जोशी यांनी व्यक्त केले.

‘मुलांची उत्सुकता आणि कुतूहल पालकांनी कधीही दाबू नये. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना नीट उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. तुला यातले काय कळते, असे म्हणून त्याला हिणवू नये. तसेच शिस्तीच्या आणि शिक्षेच्या नावाखाली त्याला मारणे, त्याच्याशी अबोला धरणे, असे प्रकारही करू नये. कारण मुले ही अतिसंवेदनशील असतात व पालकांच्या वागण्याचा त्यांच्यावर व त्यांच्या भविष्यावर विपरित परिणाम होऊ शकतो,’ असेही शुभदा जोशी यांनी म्हटले. नाशिकमधील कॉलेजरोड येथील श्रद्‌धा मॉल येथे सुरू असलेल्या ‘जीवन उत्सव’ या जीवनशैली सप्ताहात ‘संवादी पालकत्व’ या विषयावरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

पर्यावरणपुरक जीवनशैली सहज सोप्या पद्धतीने कशी जगता येईल, हे सांगणारा ‘जीवनउत्सव’ हा जीवनशैली विषयक सप्ताह गेल्या २४ जानेवारीपासून सुरू असून त्यात आतापर्यंत विविध विषयांवरील कार्यशाळा पार पडल्या आहेत. ‘जीवनउत्सव’मध्ये उद्या (२९ जानेवारी) घरातल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून घरातच सेंद्रीय भाजीपाला मिळवून देणारी गच्चीवरची बाग कशी फुलवायची, या विषयावरील कार्यशाळेत नाशिकचे संदीप चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या प्रकट मुलाखतीद्वारे जीवनशैली सप्ताहाचा समारोप होणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.