अजित पवार आणि सुनील तटकरे यांना वाचविण्यासाठी एकट्या छगन भुजबळांचा बळी देण्याचा प्रयत्न करू नका, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. ते सध्या कोकण दौऱ्यावर असून मंगळवारी ते रत्नागिरीत बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या छगन भुजबळांबरोबर अजित पवार आणि तटकरेंवर कायद्याचा बडगा उगारण्याची मागणी केली. सध्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) भुजबळांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकण्यात येत आहेत. मात्र, इतरांना वाचविण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एकट्या भुजबळांवरच कारवाई होऊ नये, असे राज यांनी म्हटले. यावेळी राज ठाकरेंनी जैतापूरविषयी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरही जोरदार टीका केली. सरकारमध्ये राहून आंदोलने कसली करता, असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी शिवसेनेला विचारला. त्यापेक्षा शिवसेनेने जैतापूरविषयची आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, असेही राज यांनी सांगितले. तर मुंबईतील मालवणी विषारी दारूच्या प्रकरणातही राज ठाकरेंनी सरकारला फटकारले आहे. सरकारचा अवैध धंद्यांवर अंकुश नसल्यामुळे राज्यात अशाप्रकारच्या अवैध धंद्यांचे पेव फुटत असल्याचे राज यांनी म्हटले.