उत्तर महाराष्ट्राला प्रतीक्षा, मराठवाडय़ाच्या पाणीसाठय़ावर परिणाम

पुणे : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत जवळपास दुप्पट पाऊस कोसळून पूरस्थिती निर्माण झाली असतानाच उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भाग मात्र अद्याप कोरडाच आहे.

नाशिकमध्ये पावसाचे प्रमाण कमी असून, नंदुरबार, धुळे, जळगाव आदी भागांत पाऊस सरासरीही पूर्ण करू शकला नाही. उत्तर महाराष्ट्रातील पावसाच्या या स्थितीमुळे स्थानिक पातळीवर पाण्याचा आणि पिकांचा प्रश्न गंभीर होत आहे. शिवाय त्याचा परिणाम मराठवाडय़ाचा मुख्य आधार असलेल्या जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठय़ावरही होत आहे. या धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत आठवडाभर जोरदार पाऊस झाला. कोकणातील सर्वच जिल्हे, तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, पुणे आदी जिल्ह्य़ांतील घाटविभागात अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. सरासरीच्या तुलनेत ९० टक्के अधिक पावसाची नोंद काही भागांत झाली. परिणामी या भागातील सर्वच धरणे आणि इतर पाणीसाठय़ांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. अनेक धरणांतून मोठय़ा प्रमाणावर विसर्गही करण्यात आला. याच्या अगदी उलटे चित्र उत्तर महाराष्ट्रात आहे. जून आणि जुलै महिन्यात आतापर्यंत या विभागात केवळ ठरावीक विभागातच पाऊस झाला आहे. अनेक भागांत अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

राज्यातील सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्य़ात झाला. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारपाठोपाठ धुळे, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्य़ांतील पाऊस उणा आहे. नाशिक जिल्ह्य़ात सरासरीच्या जवळपास पाऊस झाला असला, तरी तो काही ठरावीकच भागात झाला आहे. परिणामी नाशिक शहरात सध्या पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे.

राज्यात किती पाणीसाठा?

’राज्यातील धरणांत सर्वाधिक ६६.९७ टक्के  उपयुक्त साठा पुणे विभागात

’सर्वात कमी ३५.३६ टक्के  पाणीसाठा मराठवाडा विभागातील धरणांत

’नाशिक विभागातील धरणांत ३८.४९ टक्के

’कोकणात ५९.६६ टक्के.

’नागपूर ४०.२३ टक्के , अमरावतीमध्ये ४७.९५ टक्के

विदर्भातही पाऊस उणा

’कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही जवळपास सर्व ठिकाणी हंगामातील दोन महिन्यांची सरासरी पूर्ण

’उत्तर महाराष्ट्रापाठोपाठ विदर्भातही काही भागांत पाऊस सरासरीच्या मागे

’विदर्भातील बुलढाणा, गोंदिया, अमरावतीमध्ये प्रमाण सर्वात कमी, सरासरीपेक्षा ११ ते १४ टक्क्यांनी उणे

’अकोला आणि गडचिरोलीमध्येही पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी