सहा मध्यवर्ती कारागृहांमध्ये दुप्पट कैदी

अनेक जिल्हा कारागृहांचीही अशीच स्थिती असून तेथेही क्षमतेहून अधिक कैद्यांना कोंबण्यात आले आहे.

kopardi case,
संतोष भवाळ याला १६ तर नितीन भैलुमे याला १७ जुलैला अटक करण्यात आली होती.

 

राज्यातील ६ मध्यवर्ती कारागृहे सध्या कैद्यांनी तुडूंब भरली असून सद्यस्थितीत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी या तुरुंगांमध्ये वास्तव्याला आहेत. नवीन बॅरेक्स बांधण्याचे कामही संथगतीने सुरू असल्याने या कारागृहांवरील ताण प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. राज्यातील येरवडा, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या सहा मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांची सर्वाधिक गर्दी असल्याचे कारागृह विभागाच्या ताज्या अहवालातून दिसून आले आहे.

अनेक जिल्हा कारागृहांचीही अशीच स्थिती असून तेथेही क्षमतेहून अधिक कैद्यांना कोंबण्यात आले आहे. येरवडा कारागृहाची अधिकृत बंदीक्षमता २४४९  असताना तेथे सध्या ४२२३ कैदी आहेत. मुंबई मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ८०४ असताना तब्बल १५४० कैद्यांना ठेवण्यात आले आहे. ठाणे कारागृहात ११०५ कैद्यांची व्यवस्था आहे, पण येथे २८६९ कैदी आहेत. औरंगाबादच्या कारागृहात ५७९ क्षमता असताना दुप्पट म्हणजे ११८९ कैद्यांना ठेवण्यात आले आहे. नागपूर आणि अमरावती मध्यवर्ती कारागृहातही क्षमतेहून अधिक कैदी आहेत. एकीकडे, तुरुंगांमधील सुरक्षा आणि कैद्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मंजूर असलेल्या पदांपैकी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुमारे २५ टक्के पदे रिक्त असताना कैद्यांच्या वाढत्या संख्येने यंत्रणेवरील ताण वाढला आहे. कारागृह विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ९ मध्यवर्ती आणि ४५ जिल्हा कारागृहे आहेत. त्यात खुले कारागृह आणि महिला कारागृहांचाही समावेश आहे. सध्या राज्यातील कारागृहांची क्षमता २३ हजार ९४२ असताना ३० हजार २३० कैदी आहेत. ही टक्केवारी १२६ अशी आहे. त्यात सिद्धदोष (पक्के) कैद्यांचे प्रमाण २७ टक्के आणि न्यायाधीन कैद्यांचे (कच्चे) प्रमाण तब्बल ७३ टक्के आहे.

राज्यातील कारागृहांमध्ये दरवर्षी सव्वा लाखांहून अधिक कच्चे आणि पक्के कैदी येण्याचे सरासरी प्रमाण आहे. यापैकी ६६ टक्के कैदी जामिनावर सुटतात, तर शिक्षा सुनावली जाण्याचे प्रमाण ३४ टक्के आहे. गुन्हेगारांमध्ये सुधारणा घडवून आणणे, त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे हे कारागृह प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र, कैद्यांच्या संख्येचा विचार करता कारागृहांमधील मनुष्यबळ अल्प आहे, त्यामुळे कैद्यांचे समुपदेशन तर दूरच त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देणेही अवघड झाले आहे. अलीकडच्या काळात कारागृहांमधून कैद्यांच्या पलायनाच्या घटनाही वाढल्या आहेत.

नागपूर मध्यवर्ती कारागृहाची बंदीक्षमता १८४० असताना २१६५, तर अमरावती मध्यवर्ती कारागृहात ९७३ या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे, १०४१ कैदी आहेत. वर्ग १, २ आणि ३ च्या जिल्हा कारागृहांचीही हीच स्थिती असून अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढला आहे. त्या तुलनेत खुल्या कारागृहांची स्थिती बरी आहे. आटपाडी खुल्या वसाहतीत ११, मुंबई जिल्हा महिला कारागृहात २९८, येरवडा महिला कारागृहात ३७, मोर्शी खुल्या कारागृहात १४८, कोल्हापूर, नाशिकरोड, नागपूर, ठाणे या खुल्या कारागृहांमध्ये अधिकृत क्षमतेपेक्षा सध्या कमी कैदी आहेत. कैद्यांच्या वाढत्या संख्येने कारागृह व्यवस्थापनावरील ताण वाढला आहे. अनेक पदे रिक्त आहेत, त्याचाही परिणाम जाणवू लागला आहे. कारागृहांमध्ये कोंबलेल्या अवस्थेत कैद्यांना ठेवण्यात येत असल्याने संघर्षांचे प्रकारही वाढल्याचे दिसून आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Doubled prisoners in maharashtra six central jail