यशवंतराव चव्हाण यांचे जन्मस्थळ असणा-या देवराष्ट्रे येथील सुशोभीकरण कामाच्या दर्जाबाबत संशय असून, संपूर्ण कामाची चौकशी करण्याचे आदेश बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी पत्रकार बठकीत सांगितले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे येथील घर सुशोभीकरण काम व जतन तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहाचे सुशोभीकरण आणि गावातील अंतर्गत रस्ते अशा विविध कामांसाठी शासनाने ८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून, ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक करण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिली आहे.  
स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृह तसेच अन्य कामांची आज पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पाहणी केली त्या वेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, भारती विद्यापीठाचे सचिव डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाघमारे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण, प्रांताधिकारी दादा कांबळे, तहसीलदार हेमंत निकम, गटविकास अधिकारी संतोष जोशी, उपसभापती मोहन मोरे, डी. पी. मिहद, सरपंच रेखा मिहद आदी मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे येथील राहत्या घराचे योग्य आणि दर्जेदार पद्धतीने जतन व्हावे, यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहाचे दर्जेदारपणे सुशोभीकरण व्हावे तसेच अंतर्गत रस्ते व अन्य कामेही गुणवत्तापूर्वक व्हावीत यामध्ये कसल्याही प्रकारे हयगय करणा-या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या वेळी दिला.
देवराष्ट्रे हे एक आदर्श खेडे म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त देवराष्ट्रे येथे विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण यांच्या राहत्या घराचे सुशोभीकरण व जतन करणे, यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहाचे सुशोभीकरण, सागरेश्वर अभयारण्य येथे स्वागत कमान व अभ्यागतकक्ष निर्माण करणे, जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करणे, परिसरातील आणि देवराष्ट्रे गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे करणे, बालभवन, प्राथमिक शाळा आवारातील हॉल, माध्यमिक शाळा दुरुस्ती, अभयारण्यातील अन्य कामे अशी विविध कामे शासनाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. ही कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेशही पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या वेळी दिले.
या वेळी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण यांच्या घराची पाहणी केली, तसेच स्मृती सभागृहाच्या कामकाजाची, गावातील अंतर्गत रस्त्यांची पाहणी करून आवश्यक सूचना केल्या.