सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील (९४) यांचे बुधवारी पहाटे बेळगाव येथील के.एल. रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पाíथव मिरज येथील वैद्यकीय रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांच्यामागे मुलगा दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, एक मुलगी, सून, नातू असा परिवार आहे.
पाटील गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. बेळगावमधील एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. यातच मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि पहाटे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. पाटील यांनी वीस वर्षांपूर्वी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार पाíथव प्रथम मिरज वैद्यकीय इस्पितळात नेण्यात आले. त्यानंतर कोंडीग्रे येथील श्रीवर्धन हरितगृह, जांभळी येथील त्यांच्या मूळ घरी व नंतर जयसिंगपूर येथे निवासस्थानी पाíथव नेण्यात आले. तेथून त्यांची कर्मभूमी असलेल्या शिरोळ येथील श्रीदत्त साखर कारखान्यामध्ये पाíथव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. या वेळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
सा. रे. पाटील यांनी वयाच्या विशीतच सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला. साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, एस.एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, मधु दंडवते यांच्या सान्निध्यात त्यांच्यावर समाजवादी विचारांचा पगडा पडला. याच पक्षाकडून त्यांनी १९५७ सालची पहिली निवडणूक लढवून काँग्रेसच्या रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा पराभव केला. नंतर ते काँग्रेस पक्षाचे कार्यकत्रे झाले. काँग्रेसमध्ये त्यांनी १९९९ व २००९ सालची निवडणूक जिंकली होती, तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते.
शिरोळचा दत्त सहकारी साखर कारखाना, उदगाव सहकारी बँक, शिरोळ तालुका दूध व्यावसायिक संघटना यांना त्यांनी ऊर्जितावस्था आणली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे ते अध्यक्ष होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना डी.लिट ही सन्माननीय पदवी दिली होती, तर नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने त्यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान केला होता. ४३ देशांचा दौरा करून त्यांनी प्रगत शेती व साखर तंत्रज्ञान ग्रामीण भागात रुजवण्यासाठी प्रयत्न केले. कोंडीग्रे येथे १०५ एकर जागेत त्यांनी खुलवलेली हरित शेती कृषी क्षेत्रात वैशिष्टय़पूर्ण ठरली आहे.
