scorecardresearch

मराठी साहित्यिकांनी आधी गांधींची उपेक्षा, उपहास, उग्र विरोध केला आणि मग खूनच केला – डॉ. अभय बंग

“आधी मराठी साहित्यिकांनी याची उपेक्षा केली, मग उपहास केला, मग उग्र विरोध केला आणि त्यानेही साध्य झालं नाही म्हणून गांधीजींचा खूनच करून टाकला”, असा गंभीर आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केला.

Mahatma Gandhi Dr Abhay Bang
डॉ. अभय बंग यांची महात्मा गांधींवरील प्रतिक्रिया… (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“आधी मराठी साहित्यिकांनी याची उपेक्षा केली, मग उपहास केला, मग उग्र विरोध केला आणि त्यानेही साध्य झालं नाही म्हणून गांधीजींचा खूनच करून टाकला”, असा गंभीर आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केला. यावेळी त्यांनी ‘मी नथूराम बोलतो’ या नाटकातून होणाऱ्या गांधी हत्येच्या उदात्तीकरणाविषयी नाराजीही व्यक्त केली. ते शनिवारी (४ फेब्रुवारी) वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत बोलत होते.

डॉ. अभय बंग म्हणाले, “महात्मा गांधी स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक होते. १९२०-४७ या काळात स्वातंत्र्याचं महाभारत घडलं. मराठी साहित्यिक आणि मराठी साहित्याने वैचारिक क्षेत्रात याला न्याय दिला. मात्र, मराठी ललित साहित्यात दुर्दैवाने वाळवंट आढळतं. मराठीत शिवाजी महाराज किंवा मराठ्यांचा इतिहास यावर मोठ्या लोकप्रिय सुंदर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. मात्र, गेल्या शतकात मराठी साहित्यिकांच्या दारात जो जीवंत इतिहास घडला त्याकडे दुर्लक्ष झालं.”

“आधी गांधींची उपेक्षा, उपहास, उग्र विरोध केला आणि मग खूनच केला”

“आधी मराठी साहित्यिकांनी याची उपेक्षा केली, मग उपहास केला, मग उग्र विरोध केला आणि त्यानेही साध्य झालं नाही म्हणून गांधीजींचा खूनच करून टाकला. ही मराठी साहित्यिकांची मोठी मर्यादा आहे. या महाभारतातून महाकाव्य निघावं, महाकादंबरी निघावी असं काहीही घडलं नाही. उलट दुर्दैवाने ‘मी नथूराम बोलतो’ असं नाटक निघालं,” असा आरोप डॉ. अभय बंग यांनी केला.

“बहुतेक लेखक ब्राह्मण होते आणि…”

“मराठी साहित्यिकांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की, खरंच असं घडलंय की माझं वाचन अपुरं आहे. खरंच असं घडलं असेल तर का घडलं असेल? आमचा संकुचित प्रांतवाद मध्ये आला की गांधीजी मराठी नव्हते, की आमची जातीयता मध्ये आली? बहुतेक लेखक ब्राह्मण होते आणि टिळकपंथी होते. नेमकं काय घडलं? गांधी आम्हाला का आपलासा वाटला नाही?” असा प्रश्नही डॉ. बंग यांनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 15:10 IST
ताज्या बातम्या