“ज्यांना वाटत असेल की, समाजात दारू असावी, तर त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ताब्यात द्या”, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केली. तसेच दारू पिणं आरोग्याला चांगलं आहे असं मानणारे जादुटोणा करणाऱ्यांएवढेच अडाणी, अंधश्रद्धाळू, अवैज्ञानिक असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं. ते शनिवारी (४ फेब्रुवारी) वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. अभय बंग म्हणाले, “हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम या सगळ्याच धर्मांनी हजारो वर्षांच्या अनुभवांनंतर दारू पिऊ नका असं सांगितलं. त्या पाठीमागे इतक्या वर्षांचा अनुभव आहे. यानंतरही ज्यांना वाटत असेल की, समाजात दारू असावी, तर त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ताब्यात द्या. कारण ते अवैज्ञानिक आहेत. खेड्यातील जादुटोणा करणारे जेवढे अवैज्ञानिक व अंधश्रद्ध आहेत तेवढेच दारू पिणं आरोग्याला चांगलं आहे असं मानणारे तेवढेच अवैज्ञानिक, अंधश्रद्धाळू, मागास आणि अडाणी आहेत.”

“२०१७ मध्ये आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा अभ्यास झाला”

“दारू आरोग्याला चांगली आहे म्हणणारे अडाणी आहेत हे अभय बंग म्हणत नाहीये. मी असं म्हणतो आहे कारण २०१७ मध्ये आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा अभ्यास झाला. त्यात चार अब्ज लोकांच्या आरोग्याचा डेटा वापरला गेला. जगाच्या इतिहासात आरोग्यावर एवढा मोठा अभ्यास कधीही झाला नाही. त्याला ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज स्टडी’ असं म्हणतात. तो अभ्यास अत्यंत महत्त्वाचा होता,” अशी माहिती अभय बंग यांनी दिली.

“जगात मृत्यू, रोग आणि विकलांगतेच्या सात कारणांमध्ये दारू आणि तंबाखू”

अभय बंग पुढे म्हणाले, “या अहवालात सांगितल्याप्रमाणे, जगात मृत्यू, रोग आणि विकलांगता याची जेवढी कारणं आहेत त्यातील सर्वात वरच्या सात कारणांमध्ये एक कारण दारू आणि दुसरं तंबाखू आहे. त्यामुळे दारू आणि तंबाखू हे निव्वळ सुखद किंवा गंमत देणारे पदार्थ राहिलेले नाहीत. ते आधुनिक प्लेग आणि कॉलरा आहेत.”

“दारू पिण्याचं सुरक्षित प्रमाण शून्य इतकं आहे”

“हा अहवाल लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाला आणि जागतिक आरोग्य संघटनेने निवेदनच जारी केलं की, दारू पिण्याचं सुरक्षित प्रमाण शून्य इतकं आहे. दारूचा पहिला थेंबही तुम्हाला नुकसान करतो. कारण तेथूनच दारू पिण्याची मालिका तयार होते. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने समाजात दारू पिण्याचं प्रमाण शून्य असावं असं म्हटलं,” अशी माहिती अभय बंग यांनी दिली.

हेही वाचा : विश्लेषण : देशात मद्यसेवनाचे प्रमाण किती ? तरुणाईची संख्या किती ? राज्याची आकडेवारी काय सांगते ?

“दारू हवी म्हणणाऱ्यांकडून स्वतःच्या व्यसनापाई समाजहिताकडे दुर्लक्ष”

“यानंतरही ज्यांना दारू हवी वाटत असेल ते स्वतःच्या व्यसनापाई समाजहिताकडे दुर्लक्ष करत आहेत. दारुबंदी पुरेशी नाही. आम्ही गडचिरोली आंदोलनात दारुमुक्ती हा शब्दप्रयोग केला. त्यासाठी शासकीय दारुबंदी आवश्यक आहे. याशिवाय व्यक्तिची आणि गावाची दारुमुक्तीही हवी. दोन्ही मिळून पूर्ण धोरण बनतं,” असंही बंग यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr abhay bang comment on demand of alcohol superstition andhashraddha nirmulan samiti anis pbs
First published on: 04-02-2023 at 15:25 IST