scorecardresearch

राज्यातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते! डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात, असा आरोप ‘सर्च’ या संस्थेचे प्रमुख आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी शनिवारी केला.

राज्यातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते! डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप

शफी पठाण

(राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी) वर्धा : महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात, असा आरोप ‘सर्च’ या संस्थेचे प्रमुख आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी शनिवारी केला. वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी डॉ. बंग यांची प्रकट मुलाखत पार पडली. आचार्य विनोबा भावे सभामंडपात मुक्ता पुणतांबेकर, विनोद शिरसाठ आणि विवेक सावंत यांनी ही मुलाखत घेतली.या मुलाखतीत डॉ. बंग म्हणाले, ‘‘दारूने देशाचे मोठे नुकसान केले आहे. महाराष्ट्र तर मद्यराष्ट्र झाले आहे. दरवषी आपल्या राज्यात २ लाख कोटी रुपये किमतीचे मद्यप्राशन केले जाते. दारूमुळे भारतीय स्त्री स्वत: वैधव्याची इच्छा व्यक्त करीत आहे. मात्र, राजकारण आणि निवडणुका दारुवर विसंबून असल्याने मद्य प्रश्नांच्या समस्येला बगल देण्यासाठीच दारूबंदीचा बागुलबुवा निर्माण केला जात आहे.’’
‘मद्यपींना अंनिसच्या ताब्यात द्या’मद्यपींना अंनिसच्या ताब्यात द्या, कारण ते दारू आरोग्याच्या हिताची आहे, असे सांगून अंधश्रद्धा पसरवत आहेत, असा खोचक सल्लाही डॉ. बंग यांनी सरकारला दिला.

मराठी लेखकांकडून गांधी-विनोबांवर अन्याय
सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास उलगडताना डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांवरही काही आक्षेप घेतले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या कार्यावर विशेष असे लेखन झाले नाही. आपल्या साहित्यिकांनी एकप्रकारे गांधीझ्र् विनोबांवर अन्यायच केला. स्वातंत्र्यलढय़ाच्या काळात विविध विचारक, वेगवेगळे सेनापती इथे घडले. मात्र, या महाभारताचा वेध घेण्यात मराठी साहित्यिक अपयशी ठरले. हा इतका मोठा रंजक काळ ललित आणि बुद्धीनिष्ठतेने आता तरी साकारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सरकारी दडपशाहीविरुद्धचा ठराव महामंडळाने फेटाळला
वर्धा : ‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर केलेला पुरस्कार राज्य सरकारने रद्द केला. शासनाची ही कृती साहित्याचे अवमूल्यन करणारी तर आहेच, शिवाय दडपशाही दर्शविणारीही आहे. त्यामुळे शासनाच्या या कृतीचा निषेध करणारा ठराव संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात मांडावा, अशी मागणी मराठवाडा साहित्य परिषदेने शनिवारी वध्र्यातील साहित्य महामंडळाच्या बैठकीत केली. महामंडळाने ही मागणी फेटाळल्याचे समजते.

चपळगावकर विद्रोही साहित्य संमेलनाच्या मांडवात!
अ. भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी शनिवारी विद्रोही साहित्य संमेलनाला भेट दिली. प्रस्थापित साहित्य संमेलनाच्या विचारधारेविरुद्ध विद्रोहींचे संमेलन असते. या दोन्ही साहित्य संमेलनांतील साहित्यिक फारसे परस्परांच्या मांडवात जात नाहीत. चपळगावकर यांनी या संकेताला फाटा दिला. विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून चपळगावकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी चपळगावकर यांच्याबरोबर प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 04:51 IST