शहर व जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या सार्वजनिक मिरवणुकीत बाबासाहेबांनी दिलेला उपदेश चित्ररथांव्दारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अती उष्णतेमुळे सर्वच ठिकाणी मिरवणुका दोन-तीन तासांच्या विलंबाने निघाल्या. नाशिकरोड येथील गोरेवाडीत दोन गटात झालेल्या चकमकीतून नगरसेवकाच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा अपवाद वगळता जयंती शांततेत पार पडली.
नाशिक येथे सायंकाळी सहा वाजता मोठा राजवाडा येथून मिरवणुकीला सुरूवात झाली. यावेळी खा. समीर भुजबळ, आ. वसंत गिते, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, संजय साबळे आदी उपस्थित होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विविध राजकीय पक्ष तसेच मंडळांनी स्वागत कक्ष उभारले होते. मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात ग्रंथ संपदा असलेला चित्ररथ सर्वात आकर्षक ठरला. इतर मंडळांकडून डिजेच्या दणदणाटाचा सढळ हस्ते वापर केलेला होता. मिरवणुकीशिवाय शहरात निबंध स्पर्धा, व्याख्यान, पुतळ्यास पुष्पहार अशा विविध माध्यमातून जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार मार्गक्रमण करणे हे सध्याच्या युगात गरजेचे असल्याचे मत व्याख्यानांमध्ये वक्त्यांनी व्यक्त केले. जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आवारात मिरवणूक काढण्यात आली.