भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीतून साकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज पनवेल येथे केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षांनिमित्त, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग समता व सामाजिक न्याय वर्ष २०१५-१६ साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्य़ातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृह पनवेल येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, वनसंरक्षक अलिबाग श्रीमती ज्योती बॅनर्जी, साहाय्यक जिल्हाधिकारी तथा पेणच्या प्रांत श्रीमती निधी चौधरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, पनवेल प्रांत भारत शितोळे, तसेच कार्यशाळेचे वक्ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, श्रीमती रजिया पटेल, फग्र्युसन कॉलेजचे उपप्राचार्य प्रकाश पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांनी दलित समाज, महिला व कामगार वर्ग यांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांची प्रत्येक कृती ही दूरदृष्टीची होती. त्यांचे कार्य व विचार जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी आपापल्या कृतीतून सर्वांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही त्यांनी या वेळी बोलताना केले. तर याप्रसंगी मार्गदर्शन करताना दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्त्व एखाद्या विशेषणाने पूर्णत: साकारणे शक्य नाही, म्हणूनच त्यांना महामानव म्हणून संबोधले जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक पलू आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत संघर्ष करून त्यांनी आपल्यासाठी जे कार्य केले ते तसेच त्यांचे मौलिक असे विचार सर्वदूर पोहोचवावेत यासाठी हे १२५वे जयंती वर्ष असून हेच मुख्य उद्दिष्ट आहे. कार्यशाळेत ग्रामस्वच्छता या विषयावर भारत पाटील यांनी उद्बोधक असे प्रभावी प्रबोधन केले. साध्या व सोप्या शब्दांत त्यांनी अनेक उदाहरणांसह ग्रामस्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री-पुरुष समानताबाबतचे कार्य या विषयावर श्रीमती रजिया पटेल यांनी, तर भारतीय संविधान सद्य:स्थिती या विषयावर प्रकाश पवार यांनीही आपले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यशाळेची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. साहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार यांनी प्रास्ताविक केले, तर नायब तहसीलदार श्री. गोसावी यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यशाळेस जिल्ह्य़ातील राजपत्रित अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते