आसाराम लोमटे, लोकसत्ता परभणी : कृषी विद्यापीठाची शेकडो हेक्टर पडीक जमीन, संशोधनाच्या आघाडीवर दिसून येणारी उदासीनता, वेगवेगळय़ा ठेकेदारीसाठी राजकीय कार्यकर्त्यांचा होणारा उपद्रव, वर्षांनुवर्षे त्याच त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले अधिकारी- कर्मचारी असे अनेक अडसर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रगतीच्या वाटेवर आहेत. नवनियुक्त कुलगुरू डॉ. इंद्रमणि यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक नवे संकल्प जाहीर केले असले तरी असंख्य आव्हानांचा डोंगर त्यांच्यासमोर आहे. डॉ. इंद्रमणि यांचे कृषी यांत्रिकीकरणात मोठे योगदान असून भारतीय कृषी संशोधन संस्थेचे सहसंचालक म्हणून यापूर्वी ते कार्यरत होते. कोरडवाहू शेती व भाजीपाला यांत्रिकीकरण, अल्पभूधारक यांत्रिकीकरण या क्षेत्रात त्यांचे संशोधन देशभर नावाजले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. कधी काळी परभणीच्या कृषी विद्यापीठाने नांदेड-४४, ही संशोधित कापसाची जात शोधली. कालांतराने कापसाची जागा आता बिटी बियाण्याने भरून काढल्याने नांदेड-४४ हे वाण आपोआपच कालबाह्य ठरले. ‘विद्यापीठ आपल्या दारी- तंत्रज्ञान शेतावरी’ या सारख्या मोहिमा कृषी विद्यापीठाकडून राबवल्या जातात किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘वनामकृवि’ने ‘उमेद’सारखे उपक्रम राबवले. काही वर्षांपासून हे उपक्रम सातत्याने राबवले जात असताना अशा सर्व उपक्रमांचे मूल्यमापन खुद्द विद्यापीठाने मात्र आतापर्यंत केले नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून महाबीजह्णला पुरविण्यात आलेल्या सोयाबीनच्या बियाण्यात भेसळ झाल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. पीक काढणी करण्यासाठी कम्बाईन हार्वेस्टरह्ण वापरण्यात आल्याने अनवधानाने त्यात शिल्लक असलेल्या आधीच्या सोयाबीन वाणाचे बियाणे मिसळले गेले असे त्या वेळी विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले. हे अनवधानाने झाले असल्याची मखलाशीही या अहवालात करण्यात आली आहे. बियाण्यात अशुद्धता आढळून आल्यानंतर याबाबत कोणतीही सखोल चौकशी न करता अथवा संबंधितांवर जबाबदारी निश्चित न करता अशुद्ध बियाण्याचे खापर हार्वेस्टरह्ण आणि अतिवृष्टीह्ण या दोन गोष्टींवर फोडून यंत्रणा मात्र नामानिराळी राहिली आहे. विद्यापीठात २०१८ मध्ये शासनाने रणजित पाटील यांची कुलसचिव म्हणून नियुक्ती केली होती. मात्र रणजित पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करीत बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने स्वत:ला वाढीव वेतनश्रेणी लागू केली. या काळात २१ लाख ४ हजार २९५ रुपयांचा अतिरिक्त पगार उचलला. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी हे पैसे शासकीय तिजोरीत जमा केले. सोयाबीन बियाणे भेसळ प्रकरण असो अथवा कुलसचिवाने केलेला गैरव्यवहार असो याबाबत कोणत्याही कारवाया झाल्या नाहीत. तरुण शेतकरी नवे प्रयोग करताना दिसत आहे. काही गावे भाजीपाला पिकविण्याच्या बाबतीत अग्रेसर आहेत. तर काही गावे फक्त फळबागांसाठी प्रसिद्ध आहेत. कधी काळी तालुक्याच्या गावी जाऊन बाजारपेठेत आपले शेतीउत्पादन विकण्याएवढीच जोखीम पत्करणारा शेतकरी आता अगदी मुंबईतल्या वाशी मार्केटपासून ते राज्यातल्या वेगवेगळय़ा भागांत आपली उत्पादने घेऊन जाण्याचे धाडस करत आहे. मराठवाडय़ाच्या शिवारात या पाऊलखुणा दिसत असताना कृषी विद्यापीठाचे पथदर्शी काम मात्र ठळकपणे दिसत नाही. एरवी कृषी विद्यापीठातल्या भोंगळ कारभाराबद्दल कोणीच आवाज उठवत नाही पण लोकप्रतिनिधी व ठेकेदार कार्यकर्त्यांचे हितसंबंध दुखावले तरच विद्यापीठातले गैरकारभार चव्हाटय़ावर आणले जातात. अन्यथा परस्परांना सांभाळून घेण्याचा उद्योग सदैव चाललेला असतो. डॉ. इंद्रमणि यांच्या कार्यकाळात ‘वनामकृवि’ने आपली नवी ओळख निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेती क्षेत्रात भविष्यात ड्रोनचा वापर वाढणार असून ड्रोनह्णचे प्रशिक्षण देणारे पहिले कृषी विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची देशभर ओळख निर्माण होईल. भारत सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार कृषी शिक्षणाचा आराखडा बदलत आहे. यापुढे आंतरविद्याशाखीय शिक्षण प्रणाली विकसित होत असून जीवनभर शिक्षणाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जायला हवे. त्यातून आपली क्षमता वाढायला हवी. शासनाकडून कृषी विद्यापीठासाठी येणारा एकही रुपया परत जाणार नाही याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. कृषी विद्यापीठात महत्त्वाच्या पिकांचे प्रात्यक्षिक घेतले जाईल. त्याद्वारे शेतकरी ते पाहण्यासाठी येतील त्याचबरोबर ‘मेरा गाव, मेरा गौरव’ या उपक्रमांच्या माध्यमातून चार वैज्ञानिकांची टीम पाच गावे निश्चित करून शेतकऱ्यांशी समन्वय साधण्याचे काम करील. - डॉ. इंद्रमणि कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ