ऐतिहासिक शंभराव्या नाट्य संमेलनाच्या आधीच अध्यक्ष निवडीवरून जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. रविवारी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत प्रचंड वाद होऊन अखेर ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली.

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांचे अर्ज आले होते. त्यापैकी पटेल यांच्या नावावर नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीने एकमतानं शिक्कामोर्तब केलं होतं. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी २० नोव्हेंबर रोजी केली होती. याचवेळी नियामक मंडळाच्या बैठकीनंतर याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असंही ते म्हणाले होते.

रविवारी नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीआधीच जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा केल्यानं सदस्य नाराज झाले. त्याचे पडसादही बैठकीत उमटले होते. पाच तास झालेल्या बैठकीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीवर तोडगा काढण्यात आला. शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल असणार आहेत. तर पुढील वर्षी होणाऱ्या १०१व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मोहन जोशी यांना द्यावे, असा तोडगा काढण्यात आला. “संमेलन अध्यक्षांची निवड घटनेनुसारच झाली आहे. कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेले नाही. मराठी रंगभूमी ग्लोबल करण्यात पटेल यांचं योगदान मोठं आहे. त्यामुळेच त्यांच्या नावावर एकमत झालं,” असं नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी अध्यक्ष निवडीनंतर सांगितलं.

डॉ. जब्बार पटेल यांचं सिनेमा आणि नाट्य क्षेत्रात महत्त्वाचं योगदान आहे. डॉ. पटेल यांनी आजवर अनेक नाटकं आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये जैत रे जैत, मुक्ता, सामना, सिंहासन, एक होता विदूषक यासारख्या सिनेमांचा समावेश आहे. त्याचबरोबर राज्य शासनाची निर्मिती असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला. प्रायोगिक नाट्य चळवळीसाठी त्यांनी थिएटर अकादमी ही संस्थाही स्थापन केली आहे.