खरा कलावंत ग्रामीण भागातच जन्मतो- डॉ. जब्बार पटेल
संवेदनशीलता ही कलावंताची खरी ओळख आहे. त्यामुळे एखाद्या घटनेचा विरोध करतांना हिंसक पध्दतीने आंदोलन करण्याऐवजी सर्वच कलावंतांना एखाद्या घटनेचा त्रास होत असेल, तर थेट पुरस्कार वापसी किंवा टोकाची भूमिका घेण्याऐवजी नाटक, चित्रपट, कविता अथवा चित्र, अशी कलाकृती निर्माण करून विरोध करायला हवा, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नाटय़ व चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. खरा कलावंत हा पुण्या-मुंबईत नव्हे, तर ग्रामीण भागातच जन्माला येतो, असेही ते म्हणाले.
६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनात अजय गंपावार यांनी डॉ. जब्बार पटेल यांची मुलाखत घेतांना त्यांना विविध विषयांवर बोलते केले. ते म्हणाले, पंढरपूर येथे जन्म, सोलापुरात प्राथमिक शिक्षण आणि पुण्यात वैद्यकीय शिक्षणासह नाटय़ आणि चित्रपटक्षेत्रातील प्रवास, हे सारेच एखाद्या अपघातासारखे होते. कलावंत अपघातानेच घडतो आणि आपणही बालपणी झालेल्या एका सुखद अपघातानेच या क्षेत्राकडे वळलो. वडील रेल्वेत होते. सतत बदली. त्यामुळे आत्या आणि काकांकडे राहायचो. याच वेळी प्राथमिक शिक्षणासाठी वडीलांनी ऊर्दू शाळेत टाकले. मात्र, माझे मराठी भाषेवरील प्रेम आणि सर्व सवंगडी मराठी असल्याचे वडीलांना उमजल्यावर त्यांनीच पालिकेच्या मराठी शाळेत पाठविले. याच वेळी चाळीत वास्तव्याला असतांना कवी राणा यांच्या संपर्कात आलो. त्यांच्यामुळे अवघ्या ८ व्या वर्षी चेहऱ्यावर मेकअप लावून आचार्य अत्रे यांच्या नाटकात काम केले. या संधीचे सोने करून रंगमंचावर पहिला डॉयलॉग बोलताच रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटांनी स्वागत झाले. आजही तो आवाज शरीरात घुमतो. त्याच क्षणी कलावंत होण्याचा निर्णय घेतला. पुढे वडीलांची पुन्हा इतरत्र बदली झाली. यावेळी मात्र त्यांनी श्रीराम पुजारी या माझ्या शिक्षकाकडेच शिक्षणासाठी ठेवले. त्यांच्याच घरी वास्तव्याला असतांना पं.भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, मंगेश पाडगावकर, कवी अनिल, मर्ढेकर, बोरकर यांच्यासारख्यांचा सहवास लाभल्याने घडत गेलो. वैद्यक शिक्षणासाठी पुण्यात आलो. पीडीएशी जोडला गेलो आणि स्नेहसंमेलनात ‘प्रेमा तुझा रंग कसा’ सादर करतांना परीक्षकांकडून हा मुलगा अतिशय सुंदर काम करतोय, अशी दाद मिळाली. त्यानंतर विजय तेंडूलकरांचे ‘श्रीमंत’सारखे बंडखोर नाटक स्नेहसंमेलनात सादर केले. नाटकांचे धडे डॉ. श्रीराम लागू यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. विजय तेंडूलकरांसोबत सर्वाधिक कामे केली. त्यांचे ‘अशी पाखरे येती’ राज्य नाटय़ स्पध्रेत सर्वप्रथम आले आणि सर्व बक्षीसेही मिळाली. त्यामुळेच पुढे विजय तेंडूलकर यांचे ‘घाशीराम कोतवाल’ मिळाले. या नाटकाची ९ पाने लिहिलेली असतांनाच त्यांनी वाचायला दिली. पुढे तीन महिन्यात त्यांनी ते पूर्ण केले आणि भास्कर चंदावरकर, मोहन आगाशे यांच्यासह ते नाटक बसवले. पेशवाईच्या शेवटच्या काळावरील हे नाटक ढासळलेली राज्यव्यवस्था कशी रसातळाला येते, राज्य व्यवस्था एका व्यक्तीला मोठे करते आणि एका क्षणात त्याला जमीनदोस्तही करते, हे यात होते. १९७२ मध्ये ते आले आणि त्यानंतर १९७७ मध्ये इंदिरा गांधींची आणीबाणी आली. त्या काळी बंडखोर नाटक म्हणून ते बरेच वादग्रस्त ठरले. मात्र, या नाटकाला पुणेकरांनी उचलून धरले, तर मुंबईत तीव्र विरोध झाला. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, जपानमध्येही त्याचे प्रयोग झाले. त्यासाठी डॉ. मोहन आगाशे यांनी सर्वार्थाने यशस्वी प्रयत्न केले. या नाटकाचे संपूर्ण श्रेय तेंडूलकर व डॉ. आगाशे यांचच, असेही त्यांनी नम्रपणे कबूल केले.
या नाटकासाठी विदेशात जातांना तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी कशी विमानातून आम्हाला थेट सहारा एअरपोर्ट व तेथे विदेशात पाठविले, याचाही किस्सा त्यांनी सांगितला. त्यामुळे या नाटकाचे विरोधक खिंडीत सापडले आणि आम्ही हवेतून विदेशात पोहोचलेलो होते. ‘घाशीराम’मुळेच सर्व काही मिळाल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. याच वेळी रामदास फुटाणे यांनी ‘सामना’ची घोषणा करून दिग्दर्शक म्हणून संधी दिली. त्यासाठीही तेंडूलकरांचीच पटकथा होती. यातील ‘सख्या रे घायाळ मी हरणीह्ण हे गीत लता मंगेशकर यांनी गायले आणि यासाठी एक पैसाही मानधन घेतले नाही. ‘सामना’ची बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली होती. यापूर्वी या महोत्सवात केवळ भारताचे दारिद्रय़ दाखविणारे चित्रपट गेले होते. मात्र, दारिद्रय़ कशामुळे, हे दाखविणारा ‘सामना’ हा एकमेव चित्रपट होता, अशी कौतूकाची थाप बर्लिनवासियांकडून मिळाली. पुढे ‘सिंहासन’ आला. त्याचीही पटकथा तेंडूलकरांचीच. त्यानंतर लता मंगेशकर यांचा ‘जैत रे जैत’ केला. यात ह्रदयनाथ मंगेशकरांची १९ गाणी आणि ती सर्व लतादीदींनी गायलेली होती. आज मुले सुफी संगीतात रमलेली आहेत. मात्र, रफी, लताकडे त्यांना यावेच लागेल. राज्य घटना हा सर्वात मोठा धर्मग्रंथ असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘उंबरठा’ही चांगलाच गाजला. यातून स्मिता पाटील ही गुणी अभिनेत्री मिळाली. सुरुवातीला तेंडूलकरांना ती नको होती. कारण, त्यांनी तिला ‘जैत रे जैत’मध्ये त्यांनी बघितले होते, परंतु ‘उंबरठा’च्या प्रिमियरनंतर त्यांनी स्मिताचे कौतूक केले. यावेळी स्मिताही त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडल्याची आठवण त्यांनी सांगितली. यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’चे दिग्दर्शन केले. याच्या रिसर्चसाठी शरद पवार यांनी मृणाल गोरेंच्या सांगण्यावरून १ कोटी रुपये दिले होते. कोलंबिया युनिव्हर्सिटीनेही चित्रीकरणासाठी पैसे घेतले नाही. तसेच महाडमध्ये चित्रीकरणात लोक स्वखर्चाने सहभागी झाली.