जिद्द व चिकाटी असेल तर हवे ते प्राप्त करता येतेच हे औरंगाबाद केंद्रातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देत ४९७ गुणांसह अव्वल स्थान मिळविणाऱ्या धुळे येथील डॉ. कुणाल मनोहर पाटील यांनी सिध्द केले आहे. याआधीच्या परीक्षेतही त्यांनी यश मिळविले होते. परंतु प्रथम श्रेणीचे पद थोडक्यात हुकल्याने पुन्हा एकदा प्रयत्न करीत आता त्यांनी ‘सहाय्यक विक्रीकर आयुक्त’ या पदाला गवसणी घातली. आपल्या यशात ‘लोकसत्ता’, इंडियन एक्स्प्रेस’ यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
सध्या नाशिक येथे विक्रीकर निरीक्षक म्हणून कार्यरत डॉ. पाटील यांना लहानपणापासून असलेली वाचनाची आवड हे यश मिळवून देण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरली. वृत्तपत्र, पाक्षिक, मासिक असे सर्वसाधारणपणे सामान्य ज्ञान वाढविणारे वाचन त्यांच्याकडून लहानपणापासून होत गेले. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सामान्य ज्ञानाकडे विशेष लक्ष देण्याची गरज त्यांना भासली नाही. चौथी आणि सातवी इयत्तेत असताना मिळविलेली शिष्यवृत्ती असू द्या किंवा सहावीत असताना राष्ट्रीय गुणवत्ता शोध (एनटीएस) परीक्षेत उत्तर महाराष्ट्रात मिळविलेला प्रथम क्रमांक असू द्या. डॉ. पाटील यांना त्यांच्या सामान्य ज्ञानाने कायम साथ दिली.
‘एमपीएससीची तयारी करताना दिवसातून सहा ते सात तास त्यासाठी देत गेलो. लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांमधील बातम्या, विशेषत्वाने संपादकीय पानांवरील लेखांमुळे आपोआपच तयारी होत गेली. अर्थविषयक घडामोडींची परिपूर्ण माहिती या  वृत्तपत्रांमुळे मिळत गेली. त्यामुळे त्याचा विशेष असा अभ्यास करावा लागला नाही.’ असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
दंतविद्या शाखेची (बीडीएस) पदवी मिळविलेल्या डॉ. पाटील यांनी इंटरनेट, ‘स्टडी सर्कल’ तसेच ‘लोकराज्य’सारख्या सरकारी मासिकांमुळे विविध योजनांची माहिती मिळत गेल्याचे नमूद केले. इंटरनेटचे जाळे सर्वत्र फैलावल्यामुळे तसेच तालुक्यांच्या ठिकाणीही आता बहुतेक माहिती उपलब्ध होऊ लागल्याने अलीकडे एमपीएससीत ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक प्रमाणावर चमकू लागल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. ग्रामीण भागात गुणवत्ता होतीच, परंतु याआधी हे सर्व काही त्यांना त्यांच्या भागात मिळत नव्हते. आता परिस्थिती बदलली असल्याचे मत डॉ. पाटील यांनी मांडले.
पर्यावरणप्रेमी असलेले डॉ. पाटील हे धुळ्यातील सर्पविहार या सर्पमित्र संघटनेचे सदस्यही आहेत. भारतीय दूरसंचारमधून निवृत्त झालेले वडील, आई गृहिणी, बहीण शिक्षिका, पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला मोठा भाऊ असे डॉ. पाटील यांचे कुटूंब आहे.