सांगली : रुग्णाला बोलते ठेवून मेंदूजवळची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे मिरजेतील सेवासदन हॉस्पिटलमध्ये पार पाडल्याची माहिती, डॉ. सुधांशू रेवतकर यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.डॉ. रेवतकर यांनी सांगितले, सांगलीवाडी येथील रुग्ण प्रदीप पाटील यांच्या मेंदूजवळ साडेचार सेंटीमीटरची गाठ झाली होती. मेंदूमध्ये ज्या ठिकाणी भाषेचे नियंत्रण क्षेत्र असलेल्या ठिकाणी ही गाठ तयार झाली होती.

या ठिकाणच्या संवेदनांमुळेच बोलणे अथवा वाचन करण्याची क्षमता, रंग ओळखण्याची क्षमता निर्माण होते. मात्र या ठिकाणीच ही गाठ झाली असल्याने रुग्णाचे उच्चार अव्यवस्थित होते, रंग सांगता येत नव्हते. अशावेळी शस्त्रक्रिया करत असताना हा भाग शोधणे आणि त्याला इजा न होता गाठ काढणे हे जोखमीचे काम होते. अशावेळी रुग्णाला प्रथम बेशुध्द करून त्याच्या मेंदूजवळ गाठ काढत असताना त्याची शब्दांची संवेदना लुप्त होऊ नये यासाठी रुग्ण जागा ठेवून त्याला बोलते ठेवून ही शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. यासाठी चार तासांचा अवधी लागला. सध्या रुग्ण सामान्य झाला असून त्याला शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांच्या उपचाराने आज घरी पाठविण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयाचे संचालक डॉ. रविकांत पाटील यांनी सांगितले, रुग्णालयातील मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. रेवतकर यांनी भूलतज्ज्ञ डॉ. दर्शना पांडे आणि सहायक यांच्या सहकार्यातून ही जोखमीची शस्त्रक्रिया पार पडून रुग्ण सामान्य जीवन व्यतित करण्यास सज्ज झाला आहे. शासनाच्या महात्मा फुले योजनेतून ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.