सुलभा आरोसकर
वयाच्या ६३ व्या वर्षी ‘अनुभूती सोल्युशन’ची स्थापना करून तंत्रज्ञानाच्या सहायाने पोलीस यंत्रणेला शेकडो गुन्हेगारी प्रकरणे मार्गी लावण्यास मदत करणार्या डॉ. शैला. ‘सिग्नल आणि स्पीच प्रोसेसिंग’च्या संशोधनातून तयार झालेल्या त्यांच्या १०० पेक्षा जास्त प्रणाली, उपकरणे ‘फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी’, ‘महाराष्ट्र सायबर पोलीस’, आदी तपास संस्थांकडे कार्यान्वित आहेत. अध्यापन करत असतानाच ‘इलेक्ट्रॉनिक्स’ विषयात ‘मास्टर्स’, पीएच. डी. मिळवून आज वयाच्या ७२ व्या वर्षीही संशोधनात मग्न असणार्या डॉ. शैला दिनकर आपटे आहेत, यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.
जगातील कोणत्याही तपास यंत्रणेला ताब्यात घेतलेला आरोपीच गुन्हेगार आहे का, हे वेगवेगळ्या पुराव्यांनिशीच सिद्ध करावे लागते. त्यातला एक तपासाचा प्रकार म्हणजे गुन्हेगाराचा आवाज पडताळणे, त्यातली सत्यता तपासणे. परंतु तंत्रज्ञानातील सततच्या बदलामुळे तेही अनेकदा आव्हानात्मक ठरते, यावर उपाय ठरणारी ‘इमोशन डिटेक्शन’, स्पीकर व्हेरिफिकेशन, नॉइज कॅन्सलेशन, स्पीकर डायरायझेशन, डीपफेक डिटेक्शन, सिग्नेचर व्हेरिफिकेशन आदी प्रणाली आणि उपकरणांचा शोध लावून शेकडो गुन्हेगार शोधून देण्यासाठी मदत करणार्या, त्यासाठी वयाच्या ६३ व्या वर्षी ‘अनुभूती सोल्युशन’ संस्था काढणार्या डॉ. शैला आपटे आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.
‘सिग्नल प्रोसेसिंग’मध्ये ४० वर्षांचा अनुभव असलेल्या, डॉ. शैला दिनकर आपटे यांनी संशोधित केलेल्या १० उपकरणांपैकी ८ उत्पादनांना ‘पेटंट’ मिळाले असून आज ‘अनुभूती सोल्युशन्स’च्या १०० प्रकारच्या वेगवेगळ्या प्रणाली, उपकरणे ही ‘फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी’, ‘फॉरेन्सिक सायन्स लॅब’, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (पुणे), ‘महाराष्ट्र सायबर पोलीस’, तसेच इतर तपास संस्थांकडे कार्यान्वित आहेत. त्यांच्या मदतीने
५०० पेक्षा जास्त गुन्हेगारी प्रकरणे मार्गी लावण्यात पोलिसांना यश आले आहे. व्हिएतनाम पोलीस खात्याकडेही ‘अनुभूती ऑडिओ ऑथेंटिकेशन एएए ५०००’ हे उपकरण असल्याचे डॉ. शैला यांनी सांगितले.
डॉ. शैला (पूर्वाश्रमीच्या शैला आगाशे) यांनी विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले खरे, परंतु त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा सापडली ती अभियंते दिनकर आपटे यांच्याशी विवाह करून सांगलीत पोहोचल्यावर. तेथील ‘वालचंद अभियांत्रिकी’ महाविद्यालयात त्या लेक्चरर म्हणून रुजू झाल्या. ‘इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये ‘मास्टर्स’, पुढे पीएच.डी.ही प्राप्त केली. तेथे सलग २७ वर्षे आणि पुढे पुण्याच्या ‘राजर्षी शाहू’ महाविद्यालयात १२ वर्षे नोकरी केली.
अध्यापनातील त्यांची ही वर्षे ‘अनुभूती सोल्युशन्स’च्या पायाभरणीची वर्षे ठरली. कारण त्यांना ‘स्पीच अँड ऑडिओ ॲनालिटिक्स’ प्रणालीचा अभ्यास करता आला आणि उपकरणांच्या माध्यमातून तो प्रत्यक्षात आणताही आला. आतापर्यंत त्यांनी पीएच. डी.च्या ११ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून त्यांचे ८०च्यावर शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांची ‘सिग्नल प्रोसेसिंग’ विषयावरील ५ पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
मुलांसाठी त्यांच्या पालकांच्या आवाजात कथा सांगणारे उपकरण तयार करण्याचा त्यांचा पहिला प्रयोग ‘अनुभूती सोल्युशन्स’ची मुहूर्तमेढ रोवणारा ठरला. त्यानंतर कॅनडास्थित एका संस्थेकडून ‘इमोशन डिटेक्शन’ आणि ‘स्पीकर डायरायझेशन’ या उपकरणांची मागणी आली. तीही त्यांनी पूर्ण केली. त्यांचे हे काम पाहून न्यायवैद्यक विज्ञान (ाः१ील्ल२्रू रू्रील्लूी) प्रयोगशाळेसाठी मार्केटिंग करणारे एका कंपनीचे व्यवस्थापक सुहास कुलकर्णी यांनी ध्वनिफीत विश्लेषणाच्या उपकरणांची मागणी केली आणि तेव्हापासून डॉ. शैला यांचा अत्याधुनिक संशोधनाचा अनोखा प्रवास सुरू झाला.
त्यांचे संशोधन ‘सिग्नल आणि स्पीच प्रोसेसिंग’ मधील असल्याने त्याचा उपयोग पोलिसांना गुन्हेगार शोधण्यासाठी होऊ लागला. एखाद्या गुन्ह्याचा ध्वनिमुद्रित पुरावा असल्यास, ‘ऑडिओ ऑथेंटिकेशन’ उपकरणात ८-१० चाळण्या असल्याने सूक्ष्म बदल टिपता येतात. त्यामुळे ध्वनिफितीची सत्यता तपासता येते. ‘स्पीकर व्हेरिफिकेशन’मुळे आरोपीच्या आवाजात कितीही फरक असला तरी तो आवाज त्याच व्यक्तीचा आहे हे ओळखायला फक्त १५ मिनिटे लागतात. तर ‘स्पीकर डायरायझेशन’मुळे एकत्र असलेल्या ७-८ व्यक्तींचे आवाज वेगवेगळे करता येतात. ‘स्पीच अँड ऑडिओ ॲनालिटिक्स’चे हे काम तपासाच्या दृष्टीने फारच मोलाचे ठरले आहे. त्यांच्या या ‘स्पीच अँड ऑडिओ ॲनालिटिक्स’ प्रणालीमुळे गुन्ह्यांच्याच नव्हे तर एकूणच आवश्यक तपासाला वेग आणि खात्रीशीर तोडगा मिळाला आहे.
या प्रणाली आणि उपकरणे सर्वांसाठी उपलब्ध करून देणार्या, आज ७२ वर्षीही आपल्या संशोधनात मग्न असणार्या डॉ. शैला दिनकर आपटे यांना ‘लोकसत्ता’चा सलाम.
shaila.apte@gmail.com
