लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : सोलापुरातील ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर (वय ७०) यांनी आपल्या निवासस्थानी रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला आहे. हे टोकाचे पाऊल त्यांनी का उचलले, याचे कारण स्पष्ट झाले नाही. त्यांच्या पार्थिवावर दुपारी उशिरा मोरे हिंदू स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय व्यवसायात आयुष्यभर नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी जपणारे डॉ. वळसंगकर यांच्या या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन होते. केवळ सोलापूर नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात त्यांनी वैद्यकीय सेवा केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उमा वळसंगकर, मेंदू विकारतज्ज्ञ मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. सोनाली, कन्या, जावई तसेच ज्येष्ठ बंधू शल्यविशारद डॉ. सतीश आणि भावजय डॉ. क्षमा असा वैद्यकीय सेवेचा वारसा लाभलेला मोठा परिवार आहे. त्यांचे वडील डॉ. पद्माकर तथा प. गो. वळसंगकर हे प्रसिद्ध फिजिशियन, समाजसेवक आणि भाजपचे माजी नगरसेवक होते.
मेंदू विकाराशी संबंधित निष्णात वैद्यकीय सेवेचा चार दशकांचा अनुभव असलेले डॉ. वळसंगकर हे ‘एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स’ रुग्णालयाचे अध्वर्यू होते. स्वतःकडे तीन छोटी विमाने बाळगणारे ते सोलापुरातील पहिलेच डॉक्टर होते. ते उत्तम व्यावसायिक पायलट होते. अतिउच्च वैद्यकीय शिक्षणासह अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानात ते पारंगत होते. म्हणूनच देशात किंवा देशाबाहेर कोठेही असल्यास तेथूनच ते आपल्या रुग्णालयातील रुग्णांकडे लक्ष ठेवून असत. व्यावसायिक यश, पैसा, कीर्ती, प्रतिष्ठा असूनही त्यांचे पाय सदैव जमिनीवर होते. वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी त्यांनी कधीही विसरली नव्हती.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी रात्री नेहमीप्रमाणे स्वतःच्या निवासस्थानी पत्नी व कन्येसमवेत जेवण केले. त्यानंतर काही वेळातच शयनगृहात त्यांनी स्वत:वर रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी मस्तकाला चाटून जवळच्या काचेला लागली. दुसरी गोळी मस्तकात थेट आरपार गेली. त्यांना बेशुद्धावस्थेत तत्काळ स्वतःच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचे पुत्र डॉ. अश्विन वळसंगकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैद्यकीय उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी व इतरांनी तेथे धाव घेतली.
दरम्यान, सकाळी डॉ. वळसंगकर यांच्या पार्थिवाची छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली. नंतर मोदीखान्यातील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती.