महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी द्रष्टेपणा दाखवत साहित्य-संस्कृती मंडळ स्थापन केले; पण आज या मंडळाचे अस्तित्वच दिसत नाही. इतर अनेक बाबींमध्ये अशीच स्थिती असून मराठीच्या दयनीय अवस्थेला सरकारच जबाबदार असल्याची टीका प्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी येथे केली.
येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचा वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच झाला; या वेळी डॉ. रसाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. भु. द. वाडीकर होते. प्रा. फ. मु. शिंदे यांच्या हस्ते प्रसाद बन सवरेत्कृष्ट वाङ्मय पुरस्काराने स्वाती चांदोरकर यांना ‘फॉरवर्ड अँड डिलिट’ या कादंबरीसाठी गौरविण्यात आले. भाषा, साहित्य व संशोधन क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे ज्येष्ठ समीक्षक डॉ. रसाळ यांना फ. मुं.च्याच हस्ते मातोश्री पद्मिनीबाई ‘बन साधना सन्मान’ प्रदान करण्यात आला.
यंदाचा प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार श्रीकांत देशमुख व प्रा. जगदीश कदम यांना त्यांच्या अनुक्रमे ‘बोलावे ते आम्ही’ आणि ‘गाव हाकेच्या अंतरावर’ या कवितासंग्रहांसाठी देऊन गौरविण्यात आले. ११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे प्रत्येक पुरस्काराचे स्वरुप होते. डॉ. रसाळ यांनी मराठी भाषेच्या दयनीय अवस्थेचे चिंतन मांडले. ते म्हणाले की, तोंडपूजेपणा करून मराठीचा विकास होणार नाही. जागतिकीकरणाच्या काळात औद्योगिक व्यवस्था मराठीतून हवी. मराठी शाळा एकामागोमाग एक बंद पडत आहेत. नव्या शाळा उघडू दिल्या जात नाहीत. इंग्रजी शाळांना प्रोत्साहन दिले जात आहे. जागतिकीकरणाच्या काळात सगळ्याच भारतीय भाषांची दयनीय अवस्था झाली आहे.
भाषेसाठी सरकार काय करू शकते याचा उत्तम आदर्शपाठ यशवंतराव चव्हाणांनी घालून दिला. साहित्य संस्कृती मंडळ स्थापन केले. आज या संस्थेच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका वाटते. ते काय करते याची कल्पनाच येत नाही. पुस्तके शासकीय गोदामात तशीच पडून राहतात. पाठय़पुस्तक निर्मिती मंडळ बंद पडले. राज्याचा कारभार मराठीतूनच झाला पाहिजे, या साठी मराठी शासकीय संज्ञा तयार करण्यासाठी स्वतंत्र खाते निर्माण केले गेले. या मार्फत परिभाषिक संज्ञा तयार केल्या. पैकी आज काहीही शिल्लक ठेवले नाही. कोणतीही भाषा सर्वच जीवन व्यवहारात वापरली गेली तरच समृद्ध बनते. मराठी आज बाजारपेठेची भाषा राहिली नाही. तिथे हिंदी चालते. बँकांमध्ये इंग्रजी सुरुच राहिले तर घरात तरी बोलण्याची भाषा म्हणून मराठी राहील की नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या वेळी पुरस्कारप्राप्त लेखकांनीही मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात प्रसाद बन वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भु. द. वाडीकर यांनी सर्व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचे कौतुक केले. समीक्षेच्या प्रांतात डॉ. रसाळ यांच्या महत्तेची नोंद घेताना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल अभिमान असल्याचे नमूद केले. सुरेश सावंत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वर्षां अच्युत बन यांनी आभार मानले.