रायगड जिल्हा आपली कर्मभूमी मानलेल्या डॉ. वैशाली या गेली ३२ वर्षे तेथे राहून जल, जंगल, जमीन सांभाळणार्‍या कातकरी आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे येथील स्त्रियांच्या नावावर सातबाराचे उतारे आले आणि बाईला स्वामित्वाचा हक्क मिळाला, आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणाचा आवाज मांडणार्‍या, महामुंबई ‘सेझ’प्रकल्प विरोधी चळवळ उभारणार्‍या, आंध्रतील कोळसा खाण उद्योगातील कातकरी वेठबिगार मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील डॉ. वैशाली पाटील आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.

पाचोर्‍यात गेलेले बालपण, समाजवादी विचारांच्या पालकांकडून मिळालेले धडे, शिक्षण अभियंत्याचे, पण कर्मभूमी रायगड जिल्हा, प्रामुख्याने पेण. कारण काय तर तेथील कातकरी, शेतकरी विशेषत: तेथील स्त्रियांना त्यांचे अधिकार, हक्क मिळवून देणे, त्यांच्यासाठी लढणे. डॉ. वैशाली पाटील यांच्या कार्यकर्तेपणाची सुरुवात अशी वेगळेपणाने झाली असली तरी आज त्या रायगडमधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मानल्या जातात ते त्यांनी गेली ३२ वर्षे यासाठी अविरतपणे केलेल्या संघर्षामुळे. स्त्रियांच्या नावे सातबाराचे उतारे करणे असो, आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणे असो, महाराष्ट्रातील ‘सेझ’ विरोधी लढा असो की सध्याचे आंध्र प्रदेशातील कोळसा खाण उद्योगातून ९८ कातकरी वेठबिगार मजुरांची सुटका करणे असो डॉ. वैशाली यांनी कायमच ‘माणूस’ महत्त्वाचा हे मानून काम केले. 

  मुंबईतील ‘सेंट झेवियर्स’ महाविद्यालयाच्या  एका उपक्रमाच्या निमित्ताने त्यांचे रायगडमधील पेण येथे येणे झाले आणि त्यांना दिसला तो मागासलेला आदीम कातकरी समाज. शेतमजूर म्हणून काम करताना त्यांना भविष्य नव्हतेच. त्याच वेळी ‘कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर’ या सरकारी अधिसूचनेनुसार वैशाली यांनी रायगडमधली पहिली ‘घरठाणाची चळवळ’ सुरू केली. त्यासाठी ‘अंकुर ट्रस्ट’ स्थापन केला आणि २००६ मध्ये ‘कूळ कायदा कलम १७’ अंतर्गत महाराष्ट्रात प्रथमच १०० स्त्रियांच्या नावे सातबाराचे उतारे केले गेले. बाई घराची मालक झाली आणि पुढे १ कोटी शेतमजुरांना त्यांचे हक्क मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यातूनच ‘रायगडमधील घरठाण जमीन हक्क चळवळीत स्त्रियांची भूमिका’ या विषयावर केलेल्या संशोधनासाठी त्यांना पीएच.डी. प्राप्त झाली. तो लढा पोहोचला शेतकरी स्त्रीला सन्मान देण्याच्या भूमिकेपर्यंत. आताही ‘मकाम’ (महिला किसान अधिकार मंच) च्या ‘नॅशनल फेसिलिटेटर टीम’ सदस्य म्हणून काम करताना राज्य शासनाच्या विशेष धोरणांतर्गत ‘जल, जंगल आणि जमीन’ सांभाळणार्‍या आदीम कातकरी आदिवासी स्त्रीला शेतकरी म्हणून खास ओळख मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.   स्त्री मग ती कातकरी, आदिवासी असो की शहरी तिचे स्वातंत्र, हक्क महत्त्वाचे, याची जाणीवजागृती करणे हा डॉ. वैशाली यांच्या कामाचा मुख्य उद्देश. यातूनच दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणानंतर त्यांनी रायगडमध्ये ‘पतंग महोत्सव’ सुरू केला. मुलींना पतंग उडवण्यास मनाई करणार्‍या समाजात मुलींनी, स्त्रियांनी मुक्तपणे एकत्र येऊन पतंग उडवत आपले स्वातंत्र, आनंद जपावा, ही त्यामागची भूमिका. गेली १४ वर्षे दरवर्षी पेणमध्ये भरणारा पतंग महोत्सव आता अलिबाग, पुणे, नागपूर येथेही भरवण्यात येतो.

  सामाजिक कामांत उडी घेतलेल्या डॉ. वैशाली यांना पर्यावरणाचा प्रश्न अस्वस्थ न करेल तरच आश्चर्य होते. त्यासाठी स्थानिक पातळीवर सुरू झालेले त्यांचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. २०१४ मध्ये

न्यू यॉर्क येथे जगभरातील लाखो लोक सहभागी झालेल्या ‘पिपल्स क्लायमेट मार्च’ मध्ये पर्यावरण कार्यकर्त्या म्हणून सहभागी होऊन त्यांनी आपली भूमिका मांडली होती. याशिवाय त्यांचे सर्वात मोठे यश म्हणजे ‘महामुंबई ‘सेझ’ प्रकल्प विरोधी शेतकरी आंदोलन. एन. डी पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या आंदोलनात शेतकर्‍यांचे संघटन करण्याचे काम डॉ. वैशाली यांनी केले. पेण-पनवेल-उरण-परिसरातील ४५ गावांतील हजारो एकर जमिनीचे अधिग्रहण रोखण्यासाठी गेली पाच वर्षे सुरू असलेल्या या आंदोलनामुळे हा प्रकल्प कायदेशीर लढाईमुळे रद्द करण्यात आला. अर्थात तेथील शेतकर्‍यांचा लढा अजूनही चालूच आहे आणि पर्यायाने डॉ. वैशाली यांचाही.

याशिवाय त्यांचे आणखी एक महत्त्वाचे काम सध्या सुरू आहे. आंध्र प्रदेशातील कोळसा खाण उद्योगातून त्यांनी आत्तापर्यंत ९८ कातकरी वेठबिगारांची मुक्तता केली असून त्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसनासाठी प्रशासन, स्थानिक संस्था यांच्याबरोबरचे प्रयत्न जारी आहेत. स्थिर उत्पन्नाचे साधन नसलेल्या कातकरी समाजातील लोकांना अनेकदा मजुरीची कामे करावी लागतात त्यातून त्यांचे होणारे शोषण थांबावे यासाठी डॉ. वैशाली प्रयत्नशील आहेत.प्रश्न शेतमजुरांचा असो, स्त्रीहक्कांचा की पर्यावरणाचा, गेली ३२ वर्षे खंबीरपणे लढणार्‍या डॉ. वैशाली यांना ‘लोकसत्ता’ चा सलाम.

मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

सहप्रस्तुती:एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड

सहप्रायोजक : पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभवलक्ष्मी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स,  केसरी टूर्स, व्ही.एम.मुसळुणकर ज्वेलर्स,  मे.बी.जी.चितळे डेअरी – भिलवडी स्टेशन, ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड

पॉवर्ड  बाय: राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्स लिमिटेड