अलिबाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पहिल्या प्र-कुलगुरूपदी महाराष्ट्राचे माजी तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद महादेवराव मोहितकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सुधारित अधिनियमांतर्गत प्र-कुलगुरू हे पद नव्याने निर्माण करण्यात आले असून, डॉ. मोहितकर १२ ऑक्टोबर रोजी पदभार स्विकारला.
डॉ. मोहितकर यांना तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय आणि शैक्षणिक कामाचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयात विविध पदांवर प्रदिर्घकाळ त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव आणि संचालक, तसेच २०२३ ते २०२६ या काळात राज्याचे तंत्रशिक्षण संचालक म्हणून काम केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी, तंत्रशिक्षण संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. टेक्विप प्रकल्पाचे राज्य समन्वयक म्हणून त्यांनी १६२.५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची अंमलबजावणी केली. तसेच आयआयटी मुंबईच्या सहकार्याने १५ संस्थांच्या मार्गदर्शनासाठी सामंजस्य करार आणि शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये थ्री-डी प्रिंटिंग, रोबोटिक्स व ऑटोमेशनसाठी उत्कृष्टता केंद्रे सुरू करण्याच्या कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासकीय सुधारणा आणि ई-गव्हर्नन्समधील कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘सर्वोत्कृष्ट संचालक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
डॉ. मोहितकर यांनी नागपूर येथील व्हीएनआयटीमधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. बडोदा येथील एम. एस. विद्यापीठातून त्यांनी एम.ई. पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली असून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांच्या नावावर तीन पेटंट्स आणि ३९ शोधनिबंध आहेत
सुधारित अधिनियमानुसार प्र-कुलगुरू हे कुलगुरूंनंतरचे विद्यापीठातील प्रमुख शैक्षणिक व कार्यकारी अधिकारी असतील. शैक्षणिक नियोजन, गुणवत्ता सुधारणा, शैक्षणिक लेखापरीक्षण, उद्योग व संशोधन संस्थांशी समन्वय आणि निधी देणाऱ्या संस्थांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल.
या नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. मोहितकर यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील ज्ञानाचा विद्यापीठाला फायदा होईल. शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, परीक्षा व निकाल वेळेत जाहीर करणे आणि संशोधनाला चालना देणे यासाठी त्यांच्या अनुभवाची मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीनंतर डॉ. मोहितकर यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजात सुधारणा करण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. शैक्षणिक वेळापत्रकाचे पालन, परीक्षा व निकाल वेळेत जाहीर करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि संलग्न महाविद्यालयांतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रशिक्षण आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये मिळावीत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
