बिपीन देशपांडे, लोकसत्ता

औरंगाबाद : घराची कळा अंगण सांगते तर शहरांची सांस्कृतिक श्रीमंती, प्रतिष्ठेचा अंदाज तेथील नाटय़गृहांवरून बांधला जातो. मात्र, मराठवाडय़ातील नाटय़गृहांची अवस्था पाहिली तर त्यांना कमालीची अवकळा प्राप्त झाल्याचे चित्र आहे. हे चित्र पालटण्यात उदासीनता दिसून येत आहे. आता पडदा उघडला असला तरी नाटय़ चळवळ पुन्हा एकदा मराठवाडय़ात गतिमान करण्यासाठी नाटय़गृहांचे नवनिर्माण करणे अपेक्षित असून वर्षांतील निम्मे दिवस रंगमंच हलता ठेवण्यासाठी हौशी कलावंतांसाठीही सवलती देण्याचा विचार व्हावा, असा सूर रंगकर्मीमधून उमटत आहे.

औरंगाबादमध्ये प्रमुख तीन नाटय़गृहे आहेत. संत एकनाथ महाराज रंगमंदिर, जगद्गुरू तुकाराम महाराज रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाटय़गृह. यातील संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीचे काम मागील तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून बंद आहे. त्यात दीड वर्ष करोनाकाळाचा गेला आहे. तेथील आसन व्यवस्थेसह वातानुकूलित यंत्र बसवण्यापर्यंतची दुरुस्ती सुरू आहे. कोटय़वधी रुपये खर्चून हे काम सुरू आहे, तर तुकाराम नाटय़मंदिराला तर अत्यंत अवकळा आलेली आहे. मुख्य नाटय़मंदिराचे काचेचे प्रवेशद्वारच मोडकळीस आले असून बाह्य़ भागातील काचा फुटण्यासह आतील छताखालचा प्लास्टर ऑफ पॅरिसचा अनेक ठिकाणचा भाग कोसळला आहे. सध्या या नाटय़मंदिराचा परिसर श्वानांचे आश्रयस्थान बनलेले आहे. भिंतींवर झाडे उगवलेली आहेत. विजेसाठीचे जनरेटरही नादुरुस्त आहे. पर्यायी एक जनरेटर असल्याचे सांगितले जाते. संत तुकाराम नाटय़मंदिराची दुरुस्ती करून ते खासगी यंत्रणेला चालवण्यासाठी देण्याचा विषय मध्यंतरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आणला होता. मात्र, तेव्हा त्याला विरोध झाला होता. आता या नाटय़गृहाचे नवनिर्माण स्मार्ट सिटीअंतर्गत कामातून करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक प्रमोद वाघ यांनी दिली आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात अलिकडेच एक नाटक व ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन पार पडले. मराठवाडय़ातील परभणी, लातूर, जालना, बीड येथील नाटय़गृहे सुस्थितीत आहेत, अशी परिस्थिती नाही. परभणीतील एका नाटय़गृहाचे काम सध्या सुरू आहे. जालन्यातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाटय़गृहाची स्थितीही यथातथाच आहे. फुलंब्रीकर नाटय़गृह मरावाडय़ातील सर्वात जुन्या काही नाटय़गृहांमधील एक आहे. परळीतील नटराज रंग मंदिराचीही अत्यंत दुरवस्था झाल्यानंतर त्याच्या नूतनीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र, मागील काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करून त्याचा लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर, असा नामविस्तारही करण्यात आलेला आहे. बीडमधील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाचीही दुरवस्था असून विजेपासूनचे अनेक प्रश्न तेथे निर्माण झालेले आहेत. अनेक नाटय़गृहांमधील रंगभूषा-वेशभूषांच्या खोल्यांची अवस्था पाहता स्वच्छतागृहे तरी साफसूफ असतील, एवढी तेथील विदारक परिस्थिती असल्याचे चित्र आहे.

मराठवाडय़ातील अनेक शहरांमधील नाटय़गृहांना अवकळा प्राप्त झालेली आहे. अगदी स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव दिसून येतो. रंगभूषा-वेशभूषेसाठीच्या जागा, ध्वनि यंत्रणा, प्रकाश योजना, विंग, पडदे, फ्लॅट्स, लेव्हल्स, यासारख्या तांत्रिक बाजूही धड नाहीत. नाटय़प्रेमापायी मुंबई, पुण्यातील कलावंत धकवून घेतात. मात्र, नाटय़गृहांची सुस्थिती जपण्यासाठी ताबा असलेल्या महापालिका किंवा तत्सम संबंधित संस्थेने काही आचारसंहिताही घालून घेणे आवश्यक आहे. नाटकगृहांचा वापर त्याच कारणासाठी शक्यतो व्हायला हवा. चळवळीशी संबंधित अधिक व्यक्तींचा समावेश असलेली एक समितीही त्यासाठी गठित करण्याची गरज आहे. नाटकांचे आयोजन करण्यासाठी सवलत देण्याचाही विचार करावा व हौशी कलावंतांसाठीही नेहमीसाठी एक वेगळी जागा दिली तर चळवळीला प्रोत्साहन मिळू शकेल.

– बाळकृष्ण धायगुडे, ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक

परळीच्या नाटय़गृहाची सध्या ६५० एवढी एकूण आसनव्यवस्था असून दीड कोटींचा खर्च करून आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात रंगमंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. करोनापूर्व काळात तीन-चार नाटकांचेही येथे आयोजन करण्यात आले होते.

– बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष.

प्रायोगिक, ग्रामीण रंगभूमीला करोनोत्तर काळात उभारी देण्यासाठी पालिका, मनपासारख्या नाटय़गृहांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या स्थानिक संस्थेसह सरकारी पातळीवरूनही भाडे आकारण्यात सवलत देण्याची गरज आहे. सर्वसामान्यांपासून कलाकारापर्यंतची सर्वाचेच करोनाकाळात हाल झाले आहेत. आर्थिक परिस्थितीचा विचार करून प्रयोगासाठी जाणाऱ्या कलाकारांनाही प्रयोगासाठी जाताना पथकरामध्येही सवलत देण्याचा विचार करावा.

– रावबा गजमल, तरुण नाटय़ दिग्दर्शक