मुंबई : राज्यात दुष्काळाची पहिली कळ (ट्रिगर-१ ) लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये पीक नुकसानीच्या पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मंगळवारी, ६ ऑक्टोबरपर्यंत केवळ ४३.७५ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या तालुक्यांमधील एकूण ३२ हजार ९०५ गावांपैकी २२ हजार ७५८ गावांमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांत एकूण लागवडीखालील क्षेत्र १ कोटी ४९ लाख १५ हजार ६ हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी ६५ लाख २६ हजार ७७१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
दुष्काळाची पहिली कळ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये विविध पिकांखालील एकूण १ कोटी ४९ लाख १५ हजार ६ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ६५ लाख २६ हजार ७७१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या क्षेत्राचे प्रमाण ४३.७५ टक्के आहे. तसेच या तालुक्यांमध्ये एकूण १ कोटी ४२ लाख ५ हजार १५४ खातेदार असून, त्यापैकी ५९ लाख ८९ हजार ४५६ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
विभागनिहाय छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक पंचनामे झाले असून, २२ लाख ४८ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रापैकी १५ लाख १५ हजार ५०१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याखालोखाल लातूर विभागात ५६.८७ टक्के आणि अमरावती विभागात ५४.५३ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
पुणे विभागात २९.५९ टक्के, नागपूर विभागात २५.२४ टक्के, तर नाशिक विभागात २१.५४ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. कोल्हापूर विभागात १५.४६ टक्के, तर कोकण विभागात केवळ १०.३१ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
काढून टाकलेल्या पिकांचेही पंचनामे
राज्यातील पहिली कळ लागू असलेल्या २६५ तालुक्यांत पंचनामा प्रक्रिया सुरू आहे. कोकण, कोल्हापूर आणि नाशिक विभागांमध्ये पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी पिके वाळून गेले आहेत किंवा वाळून गेलेली पिके शेतकऱ्यांनी काढून टाकले आहेत, त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
