अहिल्यानगर:दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत (डीपीसी) घेतली जात असलेली सिमेंट रस्त्यांची कामे आगामी काळात स्थगित ठेवण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला आहे. या संदर्भातील कार्यवाहीचे निर्देश मुख्य सचिवांच्या स्तरावरून नियोजन विभागामार्फत देण्यात आले आहेत.
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा अपव्य टाळून काटकसरीने वापर करण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत सिमेंट रस्त्यांची कामे स्थगित ठेवण्याचेही निर्देश दिले आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक २९ सप्टेंबरला झाली. त्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील अनेक भागात शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. पाणीबचतीसह टंचाई निवारण्यासाठी तसेच चारा उत्पादनासाठी, विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी निधी वळवला जाऊ लागला आहे. दुष्काळात पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून राज्य सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील सिमेंट रस्त्यांची कामे स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत निधीचा वापर पाणीपुरवठा व अत्यावश्यक कामांसाठी कारण्यावर भर देण्याचे आदेश आहेत.
सिमेंटच्या रस्त्यांच्या कामासाठी तुलनेत मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात ऑगस्टपासूनच पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. धरणात पाणीसाठा काही प्रमाणात शिल्लक असला तरी लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे गाव तलाव बंधारे कोरडेठाक पडू लागले आहेत. पाणी योजनांचे जलस्रोतही आटू लागले आहेत. धरणातील उपलब्ध पाणीसाठे ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अलीकडच्या गेल्या काही वर्षात राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था डांबरी रस्ते तयार करण्याऐवजी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना प्राधान्य देत आहे. नगर शहरातही सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चून २४ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील १८ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे सध्या सुरू आहेत. अनेक राष्ट्रीय महामार्गही सिमेंट काँक्रीटचे केले जात आहेत.
राज्य सरकारने नवीन सिमेंट रस्ते करण्यास स्थगिती दिलेली आहे. मात्र सध्या चालू असलेल्या सिमेंट रस्त्यांची कामे पुढे सुरू ठेवावीत की नाही याबाबत मात्र आदेशात कोणतीही बाब नमूद केलेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकारीही संभ्रमात असल्याचे समजले.
