अलनिनोच्या संकटामुळे यंदा १९७२ च्या दुष्काळाची आठवण करून देणारी स्थिती निर्माण झाली आहे. ५४ वर्षापुर्वी रोहिणी नक्षत्रापासूनच पाउस गायब होता. त्यामुळे खरीपाचा पेराच झालेला नव्हता. यावेळी खरीपाची पेरणी झाली, मात्र, पिक वाढीच्या काळात पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने खरीप वाया गेला. मानवाच्या अन्नाची सोय होते, मात्र, पशूधनाचे काय हा यक्षप्रश्‍न पशूपालकांना भेडसावणार आहे. आताच केवळ ४ महिने पुरेल इतपतच चारा उपलब्ध आहे. म्हणजे पुढील हंगामातील चारा येईपर्यंत म्हणजे सुमारे एक वर्षभर पुरेल इतपत  चार्‍याची व्यवस्था करावी लागणार आहे. तरच पशूधन दावणीला कायम राहील, अन्यथा जनावराविना दावणी ओस पडतील अशी भीती आहे. याबाबत काय नियोजन करता येईल याचा सविस्तर आढावा

  पावसाची अनिश्चितता, पावसातील मोठे खंड, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि उपलब्ध जलसाठ्यांवर वाढलेला ताण, या पार्डभूमीवर यंदाचा रब्बी हंगाम शेतकर्‍यांसाठी अत्यंत कसोटीचा ठरणार आहे. खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले की त्याचा परिणाम केवळ शेतकर्‍याच्या उत्पन्नावर होत नाही, तर त्याची थेट झळ पशुधनालाही बसते. शेतातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आदी पिकांपासून मिळणारा कडबा, पेंढा, हिरवा चारा आणि इतर उपउत्पादने कमी झाली की जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनतो.

त्यामुळे यंदाच्या रब्बीचे नियोजन करताना केवळ काय पीक घ्यायचे?’ हा प्रश्न न विचारता किती पाणी आहे, किती चारा आहे आणि किती जनावरे सांभाळायची आहेत?’ याचा एकत्रित विचार करणे गरजेचे आहे.

दुष्काळी परिस्थितीत शेती टिकविण्यासाठी पीक नियोजनाइतकेच पशुधन व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. अनेक शेतकर्‍यांसाठी जनावरे ही रोजच्या उत्पन्नाचा आधार असतात. दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न घरखर्चाला हातभार लावते. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात जनावरांना विकण्याची वेळ येऊ नये यासाठी चारा आणि पाण्याचे आगाऊ नियोजन करणे आवश्यक आहे.

रब्बीची सुरुवात चारा नियोजनापासून

यंदा रब्बीची पेरणी करताना शेतकर्‍यांनी एक महत्त्वाचा बदल करायला हवा. संपूर्ण क्षेत्र धान्य किंवा नगदी पिकाखाली आणण्याऐवजी काही क्षेत्र चारा उत्पादनासाठी राखून ठेवावे.

जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध पाणी लक्षात घेऊन चारा ज्वारी, इतर योग्य चारा पिके किंवा स्थानिक परिस्थितीला अनुरूप पिकांचा विचार करता येईल. मात्र चारा पिकाची निवड करताना स्थानिक कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठाचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरेल.

चारा पिकासाठी स्वतंत्र क्षेत्र ठेवण्याचा फायदा असा की, रब्बी हंगामाच्या शेवटी धान्याचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे झाले नाही तरी जनावरांसाठी काही प्रमाणात चारा उपलब्ध राहू शकतो. धान्य किती मिळेल याचा अंदाज करण्यापूर्वी जनावरांना किती चारा लागणार आहे, याचे गणित करा, हा यंदाच्या हंगामाचा महत्त्वाचा मंत्र ठरू शकतो.

कडबा म्हणजे दुष्काळातील चारा बँक’

खरीपातून उपलब्ध झालेला कडबा हा शेतकर्‍यांसाठी दुष्काळातील मोठा आधार ठरू शकतो. त्यामुळे कडबा जाळणे किंवा निष्काळजीपणे उघड्यावर टाकणे टाळावे. ज्वारी, बाजरी, मका किंवा इतर पिकांचा उपलब्ध कडबा व्यवस्थित वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावा. कडबा जमिनीवर थेट ठेवण्याऐवजी उंचावर साठवावा. पावसाचे पाणी आत जाणार नाही, तसेच हवा खेळती राहील अशा पद्धतीने त्याची रचना करावी. कडबा साठवताना ओलावा राहिल्यास बुरशी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे कडबा पूर्णपणे वाळल्यानंतरच साठवावा. साठवलेल्या चार्‍याची वेळोवेळी पाहणी करावी. दुष्काळाची तीव्रता वाढली की चार्‍याचे दर वाढण्याची शक्यता असते. त्या वेळी बाजारातून महागडा चारा खरेदी करण्यापेक्षा स्वत।कडे साठवलेला कडबा उपयोगी पडतो.

चारा बँक’ गावाची गरज

दुष्काळ हा केवळ एका शेतकर्‍याचा प्रश्न नसतो. गावातील अनेक शेतकर्‍यांना एकाच वेळी चार्‍याची गरज भासू शकते. त्यामुळे ग्रामपंचायत, दूध संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून गावपातळीवर चारा बँक उभारण्याचा विचार करता येईल. ज्या शेतकर्‍यांकडे अतिरिक्त कडबा आहे, त्यांनी तो योग्य पद्धतीने साठवून ठेवावा. गरजू पशुपालकांना तो उपलब्ध करून देता येईल. सामूहिक पद्धतीने चारा खरेदी केल्यास वाहतूक आणि खरेदीचा खर्चही कमी करण्याची शक्यता असते.दुष्काळाच्या काळात चार्‍याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा टंचाई येण्यापूर्वी चारा साठवणे अधिक शहाणपणाचे ठरेल.

जनावरांची संख्या आणि उपलब्ध चारा यांचा मेळ

दुष्काळात प्रत्येक जनावराला पुरेसा चारा देणे शक्य आहे का, याचे गणित पशुपालकांनी आधीच करावे. जनावरांची संख्या, उपलब्ध कडबा, हिरवा चारा, पशुखाद्य आणि पाण्याची उपलब्धता याचा अंदाज घ्यावा.

दूध देणारी जनावरे, गाभण जनावरे, प्रजननासाठी आवश्यक जनावरे आणि लहान वासरे यांना पोषणाच्या दृष्टीने प्राधान्य द्यावे. अत्यंत चारा टंचाई निर्माण झाल्यास पशुधनाची संख्या आणि उपलब्ध संसाधने यांचा आर्थिक मेळ घालणे आवश्यक ठरते. भावनिक निर्णय घेण्याऐवजी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाच्या स्याने निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.

चारा फक्त कडब्यावर अवलंबून नको

दुष्काळी परिस्थितीत केवळ कडब्यावर जनावरांचा आहार ठेवणे योग्य नाही. उपलब्धतेनुसार हिरवा चारा, कोरडा चारा, संतुलित पशुखाद्य आणि खनिज मिश्रण यांचा योग्य समन्वय आवश्यक आहे. दूध देणार्‍या जनावरांना त्यांच्या उत्पादनानुसार संतुलित आहार मिळणे गरजेचे आहे. चार्‍याची कमतरता असल्यास दूध उत्पादन घटू शकते. त्यामुळे चारा कमी आहे म्हणून आहार पूर्णपणे कमी करणे’ हा उपाय न करता उपलब्ध संसाधनांचा पौष्टिकतेनुसार वापर करणे आवश्यक आहे.

पाणी पिकांसाठी की जनावरांसाठी?

दुष्काळात हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. विहीर, कूपनलिका किंवा शेततळ्यातील उपलब्ध पाणी संपूर्णपणे पिकांसाठी वापरल्यास नंतर पिण्याच्या पाण्याचा आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून रब्बीची पेरणी करण्यापूर्वी पाण्याचे स्वतंत्र बजेट करावे. घरासाठी, जनावरांसाठी, पाणी पिकासाठी किती पाणी उपलब्ध आहे? उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकेल का? या प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय मोठ्या क्षेत्रावर पेरणी करू नये.

जनावरांसाठी पाण्याची कमतरता म्हणजे दुहेरी नुकसान

जनावरांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळाले नाही तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दूध देणार्‍या जनावरांच्या उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चारा उपलब्ध करून देतानाच पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. शेतातील पाण्याचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरण्याऐवजी काही पाणी पशुधनासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असेल तर गावपातळीवर टँकर किंवा इतर पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायत व प्रशासनाकडे वेळेत मागणी करावी.

रब्बीत पीक निवडताना पाणी’ पहिला निकष

दुष्काळी वर्षात रब्बीचे पीक निवडताना बाजारभाव हा पहिला निकष नसावा. पाण्याची गरज, जमिनीतील ओलावा, पिकाचा कालावधी आणि उपलब्ध सिंचन हे निकष महत्त्वाचे आहेत.

ज्या शेतात पाण्याची खात्री नाही, तिथे कमी पाण्यात येणार्‍या पिकांना प्राधान्य देता येईल. परिस्थितीनुसार हरभरा, करडई आणि रब्बी ज्वारी यांसारख्या पिकांचा विचार करता येतो.

ज्या शेतात एक-दोन संरक्षित पाण्याची सोय आहे, तिथे पिकांची निवड त्यानुसार करावी. परिस्थितीनुसार काही क्षेत्र कडधान्यासाठी, काही क्षेत्र धान्यासाठी आणि काही क्षेत्र चार्‍यासाठी राखावे. उपलब्ध पाण्याच्या प्रमाणानुसार पिकांचे क्षेत्र कमी-जास्त करावे.

पशुखाद्याचा खर्च कसा कमी करायचा?

चारा महाग झाल्यास पशुपालकांचा खर्च झपाट्याने वाढतो. त्यामुळे उपलब्ध कडबा, हिरवा चारा आणि बाजारातून मिळणारे पशुखाद्य यांचा संतुलित वापर करावा. कडबा योग्य प्रकारे साठविल्यास त्याची नासाडी कमी होते. उपलब्ध चार्‍याचा अपव्यय होऊ नये म्हणून जनावरांना योग्य आकाराच्या खाद्यपात्रातून चारा द्यावा. स्थानिक पातळीवर उपलब्ध असणार्‍या सुरक्षित कृषी उपउत्पादनांचा पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या स्याने आहारात समावेश करता येतो. मात्र कोणतेही नवीन खाद्य अचानक मोठ्या प्रमाणात देणे टाळावे.

जनावरांचे आरोग्यही महत्त्वाचे

दुष्काळात कुपोषणामुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे नियमित लसीकरण, जंतनाशक उपचार, पशुवैद्यकीय तपासणी आणि स्वच्छता याकडे दुर्लक्ष करू नये. जनावरांच्या गोठ्यात हवा खेळती राहील, सावली मिळेल आणि स्वच्छ पाणी उपलब्ध असेल याची काळजी घ्यावी. उष्णता वाढल्यास दूध देणार्‍या जनावरांवर विशेष लक्ष ठेवावे.

नफा’पेक्षा जोखीम कमी करणे’ महत्त्वाचे

यंदाच्या परिस्थितीत रब्बीचा मुख्य उद्देश मागील खरीपातील संपूर्ण नुकसान भरून काढणे असा ठेवणे योग्य ठरणार नाही. रब्बीत शेतकर्‍यांसमोर तीन प्रमुख उद्दिष्टे असायला हवीत-

पहिले : उपलब्ध पाण्यात पीक सुरक्षित ठेवणे.

दुसरे : कुटुंबासाठी आवश्यक अन्नधान्याची उपलब्धता राखणे.

तिसरे : जनावरांसाठी चारा आणि पाणी सुरक्षित ठेवणे.

यामुळे यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य वापर करून पशूधन वाचविणे महत्वाचे आहे. जनावरांसाठी चारा छावणी, चारा डेपो आदी सुविधा शासनाकडून उपलब्ध होतीलही. मात्र, यात चारा  म्हणून केवळ उस दिला जात असेल तर त्यांचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे चारा नियोजन करणे हे महत्वाचे ठरणार आहे.

सांगली जिल्ह्यात लहान मोठी ८ लाख १८ हजार ७०० पशू आहेत. या पशूंना मासिक ६ लाख टन चार्‍याची गरज भासते. सध्या चार महिने पुरेल  इतपतच चारा उपलब्ध असून भविष्यातील चाराटंचाईला तोंड देण्यासाठी चारा पिकाच्या बियाणांचे वाटप हाती घेण्यात आले आहे- र्डॉ. अजय थोरे पाटील, उपायुक्त पशूसंवर्धन, सांगली.