जितेंद्र पाटील

भीषण दुष्काळामुळे यंदा जिल्ह्य़ातील शेतकरी, व्यापारी तसेच नोकरदारांचे अर्थकारण विस्कटून गेले आहे. त्याचा परिणाम लग्नसराईवरसुद्धा झाला असून हाती पैसा नसल्याने अनेकांनी मुला-मुलींची लग्ने पुढे ढकलल्याने अनेक भागांत सनई, चौघडय़ाचे सूर क्षीण झाल्याचे चित्र आहे. त्याचा फटका मंगल कार्यालये, सोने-चांदी, कापड, भांडी विक्रीची दुकाने, किराणा, मंडप, वाजंत्री, छायाचित्रण व्यवसायांना बसत आहे.

तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर ग्रामीण, शहरी भागांत लग्नसराईची धामधूम दरवर्षी सुरू होते. वर आणि वधूसाठी आवश्यक खरेदीला वेग पकडते. पूरक लहान-मोठय़ा व्यवसायांना एक प्रकारे सुगीचे दिवस येतात. मंगल कार्यालये, कापड दुकाने, सोने-चांदीच्या पेढय़ा गजबजून जातात. खरेदीची लगबग वाढून सगळीकडे उत्साहाचे वातावरण पसरते. मंगल कार्यालये आगाऊ नोंदणी करण्यासाठी अक्षरश: स्पर्धा दिसून येते. संपूर्ण लग्नसराईत एकही दिवस खाली जात नसल्याने मंगल कार्यालयांचे भाडेही वाढविले जाते.  अनेकदा लहान मंगल कार्यालयेही मिळत नाही. या वर्षी मात्र अपेक्षित संख्येने लग्नकार्य जुळत नसल्याने बरीच मंगल कार्यालये ओस पडली आहेत.

वर आणि वधूसाठी सोने-चांदीचे वैविध्यपूर्ण दागिने आवर्जून घेतले जातात. लग्न बस्त्यात सोने, चांदी खरेदीसाठी खास आर्थिक तरतूद केली जाते. लग्नसराईच्या काळात सराफ बाजारात पाय ठेवायलाही जागा सापडत नाही. यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे लग्नकार्य थांबल्यामुळे सराफ बाजारातील उलाढालीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एरवी गर्दीने फुलणाऱ्या सराफ बाजारात शुकशुकाट पसरला आहे. लग्नकार्याच्या निमित्ताने मित्रमंडळी तसेच नातेवाईकांसाठी यथाशक्ती भोजनावळींचे आयोजन करण्यात येते. यामुळे विविध प्रकारचे धान्य, डाळी, तेल, मसाल्याचे पदार्थ, साखर, गूळ, तूप यांच्या खरेदीला चालना मिळते. लहान-मोठय़ा किराणा दुकानांना महत्त्व प्राप्त होते. तयार मालाची मागणी वाढल्यानंतर कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या लघुउद्योगांनाही चालना मिळते. माल वाहतुकीसाठी वाहनांची मोठय़ा प्रमाणात गरज भासू लागते.

लग्नांमुळे बाजारपेठेत एक प्रकारे चैतन्य निर्माण होते. दुष्काळामुळे अपेक्षित खरेदी थांबल्याने यंदा बाजारपेठेतील चैतन्य हरपले आहे. लग्नकार्याच्या निमित्ताने घराला आकर्षक रंगरंगोटी, विद्युत रोषणाई केली जाते. मंडप टाकून हळद, साखरपुडा आदी कार्यक्रम पार पाडले जातात. मंडप डेकोरेटर व्यवसायाला चार महिने चांगले दिवस येतात. यंदा लग्नसराईला जोर नसल्याने मंडप व्यवसायाला अवकळा आली आहे. लग्नसराईअभावी खासगी वाहतूकदार, वाजंत्री, छायाचित्रण, फुलांच्या विक्री आदी व्यवसायदेखील मंदीच्या सावटाखाली सापडला आहे. या व्यवसायांमुळे लग्नसराईच्या काळात अनेकांना हक्काचा मिळतो. यंदा हाताला पुरेसे काम नसल्याने संबंधितांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याचे चित्र आहे. छायाचित्रकार गोकुळ बावीस्कर यांनी त्यास दुजोरा दिला. दुष्काळी स्थितीमुळे अनेकांनी खर्च करण्यात हात आखडता घेतला आहे. लग्नकार्य पुढे ढकलली जात असून त्याचा परिणाम व्यवसायावर झाल्याचे त्यांनी सांगितले.

स्थिती काय?

  • तुरळक तिथीलाच लग्ने होत असल्याने मंगल कार्यालय मालकांवर नेहमीच्या भाडय़ात सवलत देण्याची वेळ आली आहे. लग्नांची संख्या घटल्याने मंगल कार्यालयाच्या देखभालीचा खर्च भागविणे मुश्कील झाले आहे.
  • अक्षय्य तृतीया वगळता लग्नसराईत अपेक्षित व्यवहार होऊ न शकल्याने सराफ व्यवसाय मंदीचा सामना करीत आहे. किराणा व्यवसायाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
  • भोजनावळींचे कार्यक्रम कमी झाल्याने स्वयंपाकाचे कंत्राट घेणाऱ्या आचाऱ्यांच्या हाताला हल्ली फार काम राहिलेले नाही. तर वाजंत्री काम मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या वर्षी विवाहासाठी चार महिने आधीच कार्यालय नोंदणी केली जात होती. या वर्षी चालू महिन्यातील नोंदणी लवकर होत नाही. अनेक तारखा आजही नोंदणीविना आहेत. जून आणि पुढील महिन्यांतील नोंदणीची अशीच स्थिती आहे.   – प्रल्हाद पाटील (व्यवस्थापन, नवजीवन मंगल कार्यालय)