अहिल्यानगर: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत केंद्र सरकारकडून मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्यावे, त्यामुळे राज्याला मदत मिळू शकेल, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज, शुक्रवारी अहिल्यानगरमध्ये बोलताना व्यक्त केली. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी यासाठी आपणही संधी मिळाली तर पाच तारखेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय उपस्थित करू, असेही आठवले यांनी सांगितले.

समाजकल्याण विभागाचा निधी इतर विभागांकडे किंवा योजनांसाठी वळवू नये, अशी आपली भूमिका आहे. वळवला गेला तर तो पुन्हा दिला गेला पाहिजे. खरंतर काही राज्यांनी कायदा केला आहे की समाजकल्याणचा निधी वळवू नये. अशाच पद्धतीचा कायदा महाराष्ट्राने करावा अशी आमची मागणी आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, याकडे लक्ष वेधले असता रामदास आठवले यांनी कॉक्रोज जनता पक्षावर भाष्य केले. ते म्हणाले, लोकशाहीमध्ये मोर्चे काढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. खरंतर काँक्रोच जनता पक्ष केवळ राजीनाम्याच्या मागणीसाठीच स्थापन झालेला आहे.

आधी त्यांनी एक राजीनामा घेतला आता दुसऱ्या राजीनामा मागणी ते करत आहेत परंतु ज्ञानेश कुमार यांचा राजीनाम्याची मागणी ते करत आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊ नये अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. मात्र निवडणुकीची मतदार यादी पारदर्शक व्हावी, कोणाचे मत कमी केले असेल तर ते पुन्हा समाविष्ट करावीत व निवडणूक आयोगाने आपली भूमिका जनतेसमोर मांडावी असेही आवाहन पाठवले यांनी केले.

रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यावर पुन्हा एकदा रामदास आठवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आजही प्रकाश आंबेडकर यांची तयारी असेल तर मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व्हावे, मी कोणतेही पद घेऊन त्यांच्यासोबत काम करेल. आम्ही एकत्र आलो तर आम्हाला मोठे यश मिळेल. लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवूनही त्यांच्या पक्षाला मान्यता मिळत नाही. आम्ही दोघे एकत्र आलो त्यावेळी १९९६ मध्ये मान्यता मिळाली होती. आज मी एकटा आहे. मी आक्रमक नसलो तरी प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर सोबत आले तर त्याचा फायदा समाजाला होईल.

ठाकरे बंधूंकडून पूर्वी मोदींची स्तुती, आता मोर्चे

पूर्वी आम्ही मोर्चे काढायचो, आता उद्धव ठाकरे मोर्चे काढत आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू राज ठाकरे हे दोघेही पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करायची आता ते मोर्चे काढत आहेत, असेही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्या मोर्चावर कविताही केली. ‘आज माझं खुश आहे मन कारण उद्धव आणि राज ठाकरे करत आहेत आंदोलन, तरीही आमच्या सोबत आहे महाराष्ट्रातलं जन मात्र आमच्याकडे अजिबात नाही धन…’