अहिल्यानगर: अंमली सदृश्य पदार्थांची तस्करी व त्यातील पोलिसांचा सहभाग या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके व भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी परस्परांवर आरोप करताना एकमेकांचे अटकेतील आरोपींसमवेतचे छायाचित्रे प्रसिद्धीस देऊन राजकीय धुराळा उडवला आहे.
माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी अटकेतील आरोपी ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे याचे खासदार लंके व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांच्या समवेतची छायाचित्रे प्रसिद्ध करून लक्ष वेधले आहे तर खासदार लंके यांनी अटकेतील आरोपी भूषण उर्फ ऋषी चतर यांचे विखे यांच्या समवेतचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके व सुजय विखे यांच्यामध्ये लढत झाली. लंके विजयी झाले, त्यानंतर दोघांतील राजकीय वैमनस्य गाजू लागले आहे.
श्रीरामपूर पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेले अंमली सदृश्य पदार्थ पोलीस मुख्यालयाच्या गोदामात जमा केले होते. या गोदामाच्या किल्ल्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी शामसुंदर गुजर याच्याकडे होत्या. या गोदामातील अंमली सदृश्य पदार्थ विक्री केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी गुजर याला अटक केली. गुजर याच्यासह आणखी तीन जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये ऋषी चत्तर व ज्ञानदेव माऊली या दोघांचाही समावेश आहे. अटकेतील आरोपी हे परस्परांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करत लंके व विखे यांच्याकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप सुरू करण्यात आले आहेत.
माजी खासदार विखे यांनी यापूर्वी गुजर याची पारनेरहून स्थानिक गुन्हे शाखेत कशी बदली झाली, अंमली पदार्थ पारनेरमध्ये कोणाच्या घरी लपवण्यात आले होते, असे प्रश्न उपस्थित करत लंके यांना लक्ष्य केले होते. आता त्यांच्याकडून आरोपी माऊली शिंदे याचे लंके पती-पत्नी समवेतचे फोटो प्रसिद्ध करण्यात आली आहेत. लंके यांचे यापूर्वी पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याचा सत्कारही लंके यांनी स्वीकारला, ‘सिस्पे’चे संचालक हे आपले पाहुणे असल्याचे वक्तव्यही लंके यांनी केले होते. याकडे विखे यांनी लक्ष वेधले आहे.
त्याला प्रत्युत्तर देताना चत्तर याच्यासमवेतचे सुजय विखे यांचे छायाचित्र लंके यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले. तसेच काचेच्या घरात बसून दुसऱ्यांवर दगड मारू नयेत, अशा शब्दात लंके यांनी इशारा दिला आहे. सार्वजनिक आयुष्यात हजारो लोक भेटतात, छायाचित्र काढतात. कोणाच्या कपाळावर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लिहिलेली नसते. अशा छायाचित्रावरून नाते जोडणे म्हणजे बालिशपणा आहे, अशी टीकाही लंके यांनी केली आहे.
जर एका छायाचित्रावरून अंमली पदार्थांशी संबंध जोडायचा असेल तर या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या समवेत विखे व पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांच्या समवेतचे छायाचित्र काय सांगतात असाही प्रश्न लंके यांनी उपस्थित करत अंमली पदार्थांचा माफिया कोण अशी टीका केली आहे.
