गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस.कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. या मालमत्तेत १२४ ठिकाणी असलेल्या जमिनी, वैयक्तिक आणि विविध कंपन्यांच्या नावे असलेली एकूण २७६ बँक खाती आणि ४६ आलिशान चारचाकी आणि दुचाकी वाहने यांचा समावेश आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या ठेवींचे पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पडल्याचे चित्र आहे.

गुंतवणुकदारांच्या फसवणुकीप्रकरणी डीएसके आणि पत्नी हेमंती हे सध्या अटकेत आहेत. त्यांच्या विरोधात शिवाजीनगर, कोल्हापूर, मुंबई यांसह अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी मालमत्ता जप्त करुन त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. डीएसके आणि पत्नी हेमंती यांच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या संरक्षण अधिनियम 1999 नुसार गुन्हे दाखल केलेले आहेत. हे लक्षात घेता राज्य शासनाने डीएसकेंच्या मालमत्ता शोधण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्याचे आदेश मिळताच १२४ ठिकाणी जमिनी, २७६ बॅंक खाते, ४६ वाहने या सर्व मालमत्तांची यादी तयार करून राज्य सरकारकडे पाठवण्यात आली. त्यानुसार त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची अधिसूचना गृह विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. तर या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुळशी-मावळचे उपविभागीय अधिकारी यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या मालमत्तांची यादी पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने पुढील कारवाईसाठी जिल्हाधिका-यांकडे पाठविली होती. तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याची जबाबदारी मावळचे प्रांत अधिकारी यांच्यावर सोपविली होती. त्यांनी मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार करुन सुमारे तीन महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठवला. त्यानंतर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता ही अधिसूचना जारी झाली आहे.

डीएसकेंची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश शासनाने अधिसूचनेद्वारे दिल्याने त्यावर कशाप्रकारे कार्यवाही केली जाते, याकडे सर्व गुंतवणुकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.