तौते चक्रीवादळासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांनी गेल्या रविवारी कोकण किनारपट्टीला दिलेल्या तडाख्याने रत्नागिरीतील हापूस आंब्याचा हंगाम अचानक संपुष्टात आला आहे.

यंदा हंगामाच्या सुरवातीलाच वातावरणातील बदलांमुळे मार्च महिन्यात येणारे पहिल्या टप्प्यातील उत्पादन फारसे आलेच नाही. त्यामुळे हंगाम लांबला व खर्‍या अर्थाने १० एप्रिलपासून बाजारात हापूस आंबा दिसू लागला होता. गेल्या पंधरा दिवसात वाशी बाजारातही जिल्ह्यातून दिवसाला ३० हजार पेटी जात होत होती. मोहोर उशीरा आल्याने १५ ते ३१ मे या कालावधीत जास्त उत्पादन हाती येईल, अशी शक्यता होती. हा शेवटच्या टप्प्यातील आंबा जास्त प्रमाणात तयार होत होता. पण वादळासह आलेले वारे व मुसळधार पावसाने झाडावर काढणीसाठी तयार होत आलेला बराचसा आंबा गळून बागेत खच पडला. त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत बाजारात नियमितपणे पुरवठा होण्याची शक्यता मावळली आहे. शिवाय, हा आंबा पडून आपटल्यामुळे कॅनिंगलासुध्दा घेतला जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे बागायतदारांना संपूर्ण नुकसान सहन करावे लागणार आहे.

दुहेरी नुकसान

रविवारी पहाटेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातल्यानंतर हे वादळ दुपारी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. ताशी ५५ किलोमीटर वेगाने वर्तुळाकार फिरणाऱ्या वार्‍यांनी हापूसच्या बागाच्या बागा पिळवटून टाकल्या. या दणक्यामुळे झाडावरील आंबे टपाटप जमिनीवर कोसळत होते. काढणी योग्य आंब्यापासुन ते कैरीपर्यंतची सर्वच टप्प्यातील फळे खाली पडली. तर अनेक ठिकाणी लागती झाडे उभी चिरली जाऊन मोडली. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. त्यापैकी सुमारे ७०-८० टक्के क्षेत्रावर आंब्याची लागवड आहे. त्यामध्ये व्यापारी दृष्ट्या उत्पन्नाचे क्षेत्र कमी आहे. त्यातच यंदा आंब्याचे एकूण उत्पादन सरासरीच्या ३० ते ४० टक्केच राहिले आणि यापैकीही सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील आंब्याच्या बागांना या वादळाचा मोठा फटका बसल्याने हंगाम संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

खतांच्या वाढलेल्या किंमतीवरुन शरद पवारांचं केंद्र सरकारला पत्र

रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम घवाळी म्हणाले की, यंदा तसाही आंबा कमीच आहे. त्यापैकी सुमारे १० टक्के झाडावर राहिला होता. तो बराचसा गळून गेला आहे. त्यामुळे आंबा जवळपास संपल्यात जमा आहे. हंगामाच्या पहिल्या आणि मधल्या टप्प्यातील आंबा उत्पादनाच्या विक्रीतून शेतकऱ्याचे सगळे खर्च भरून येतात आणि हा शेवटच्या टप्प्यातील आंबा त्याला खरा नफा मिळवून देत असतो. पण या वादळाने तोच हिरावला आहे.

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात ५२,८९८ रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर!

रत्नागिरीचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शिवराज घोरपडे यांच्या अंदाजानुसार झाडावरील सुमारे १५ टक्के आंबा उतरवणे बाकी असावे. त्यातील फळगळ मोठ्या प्रमाणात झाली असून वादळामुळे फळझाडे मोडूनही नुकसान झाले आहे. या दोन्ही प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे.