अहिल्यानगरः भाजपच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांची आज, मंगळवारी फेरनिवड करण्यात आली. मात्र, अहिल्यानगर महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी नेत्यांसह त्यांच्या समर्थक इच्छुकांमध्ये एकमत न झाल्याने, या पदाची निवड प्रलंबित ठेवण्याची वेळ पक्षावर ओढावली. नियुक्त झालेले दोन्ही जिल्हाध्यक्ष पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे समर्थक मानले जातात. महानगर जिल्हाध्यक्ष पदावरही आपल्या समर्थकाची नियुक्ती करण्याचे विखे यांचे प्रयत्न आहेत, त्यातूनच ही निवड लांबणीवर पडल्याची चर्चा होत आहे.
जिल्ह्यात भाजपचे महानगर, दक्षिण व उत्तर असे तीन जिल्हाध्यक्ष आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने या पदांना महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या २७ एप्रिलला शिर्डी येथे इच्छुकांची चाचपणी करून त्यांच्या नावांची शिफारस प्रदेश समितीकडे करण्यात आली होती. ही निवड अखेर प्रदेश निवडणूक निरीक्षक आमदार नैनसुख संचेती यांनी आज जाहीर केली.
विधानसभा निवडणुकीवेळी जिल्हाध्यक्ष असलेले विठ्ठल लंघे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत आमदारकी मिळवली व भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जिल्हा उत्तर जिल्हा कार्याध्यक्षपदी नितीन दिनकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विखे समर्थक असे त्यांची ओळख आहे. त्यांना अल्प कालावधी मिळाल्याने त्यांची पुन्हा निवड करण्यात आली. दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांची दीड वर्षांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. ते मूळचे आमदार शिवाजी कर्डिले समर्थक. आमदार कर्डिले हे विखे समर्थक असल्यामुळे भालसिंग यांच्याकडे विखेसमर्थक म्हणूनच पाहिले जाते.
महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाचे निष्ठावान व विखे समर्थक यांच्यामध्ये रस्सीखेच होत आहे. या पदासाठी सचिन पारखी, बाबासाहेब वाकळे, धनंजय जाधव, बाबासाहेब सानप आदींची नावे चर्चेत होती. आता विचार भारतीचे अनिल मोहिते यांचेही नाव पुढे आले आहे. विखे गटाकडून त्यांचे नाव पुढे करण्यात आल्याचे सांगितली जाते. परिणामी जिल्हा संघटनेवरील सभापती राम शिंदे यांची पकड सैल होताना दिसत आहे.
शिष्टमंडळे मुंबईकडे
भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. पक्षाचे निष्ठावान व विखे समर्थक यांच्यात चढाओढ सुरू आहे. त्यातूनच पक्षाचे दोन स्वतंत्र शिष्टमंडळे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आज दुपारी रवाना झाली. एकमत होत नसल्यामुळे निवड किमान आठवडाभर तरी लांबणीवर पडेल अशी चर्चा होत आहे.