लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्याने थकविलेली ऊस देयकांची रक्कम मिळण्यासाठी शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोलापुरात थेट काँग्रेस भवनासमोर चालविलेल्या आमरण उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस होता. या उपोषणाची कोंडी अद्यापि सुटली नाही. मात्र हे आंदोलन आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू असल्याने म्हेत्रे हे राजकीयदृष्ट्या अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, प्रलंबित ऊस देयकांच्या रकमा लवकरच अदा करण्याचे आश्वासन म्हेत्रे यांनी दिले आहे. मात्र या आंदोलनामागे राजकारण शिजत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीत आपणास अडचणीत आणण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुढे करून हे आंदोलन घडविण्यात आले आहे. त्यामागे कोणाचा हात आहे, हे आपण लवकरच नावानिशी जाहीर करणार असल्याचेही म्हेत्रे यांनी सांगितले.
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे काही वर्षांपूर्वी म्हेत्रे कुटुंबीयांनी मातोश्री साखर कारखाना उभारला होता. अलीकडे हा कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस देयकांच्या रकमा गेल्या आठ महिन्यांपासून थकीत आहेत. शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा आदी भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या देय रकमा थकीत आहेत. दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर बँक कर्ज उचलले गेल्याने आणि ही सर्व कर्जे थकीत असल्याने बँकांनी संबंधित शेतकऱ्यांना जप्तीच्या नोटिसाही बजावल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे इच्छुक असलेले सिद्धाराम म्हेत्रे यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापुरात काँग्रेस भवनासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्यासाठी काँग्रेसच्या गोटात सध्या तरी शांतता दिसून येते.