गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक निधीअभावी बडतर्फ

 सध्या पर्यटनाचा हंगाम नसला तरीही गणपतीपुळेत दिवसाला शेकडो पर्यटक किनाऱ्यावर हजेरी लावून जातात.

रत्नागिरी- पर्यटकांच्या सुरक्षेसाठी येथील प्रसिध्द गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर नेमलेल्या आठ सुरक्षारक्षकांना ग्रामपंचायतीने निधीअभावी सेवेतून बडतर्फ केले आहे.

या किनाऱ्यावर हौशी पर्यटक बुडाल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय असते, हे लक्षात घेता या समस्येवर तातडीने तोडगा निघाला नाही तर धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. करोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेऊन येथील समुद्रकिनाऱ्यावर १० सुरक्षारक्षकांची  नियुक्ती केली. पर्यटकांकडून कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून या रक्षकांना मानधन देण्याची व्यवस्था केली आहे. परंतु नाताळनंतर चालू महिन्यात पर्यटकांचा ओघ कमी झाल्यामुळे कराचे उत्पन्न घटले आहे. परिणामी, जीवरक्षकांच्या मानधनासाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने दहापैकी आठजणांना काम थांबवण्याची सूचना दिली आहे. पण उर्वरित दोघांनीही, त्या आठजणांना पुन्हा कामावर घेतल्याशिवाय काम करण्यास नकार दिला. त्यामुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सध्या एकही जीवरक्षक राहिलेला नाही.

 सध्या पर्यटनाचा हंगाम नसला तरीही गणपतीपुळेत दिवसाला शेकडो पर्यटक किनाऱ्यावर हजेरी लावून जातात. अशा वेळी किनाऱ्यावर जीवरक्षक आवश्यक आहे. शुक्रवारीही संकष्टी चतुर्थीमुळे येथे दिवसभर भक्तांनी हजेरी लावली. सुदैवाने कोणतीही  दुर्घटना घडलेली नाही. पण बहुसंख्य पर्यटक गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर समुद्रात पोहण्यासाठी धाव घेतात. भरती-ओहोटीच्या कालावधीत समुद्राच्या पाण्यात निर्माण होणाऱ्या भोवऱ्यात पर्यटक सापडून दुर्घटना घडते. दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. जीवरक्षकांमुळे बुडणाऱ्या पर्यटकांना आधार मिळतो. धोकादायक परिस्थितीची माहितीही जीवरक्षक पर्यटकांना देत असतात. त्यामुळे येथे जीवरक्षक आवश्यक आहेत.

दरम्यान, जीवरक्षकांच्या मानधनासंदर्भात निधीची तरतूद करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दिला होता. त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही, असे सांगण्यात आले. यावर प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Due to lack of life saving funds on the beach at ganpatipule for the safety of tourists from bad service to badass akp

Next Story
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साप्ताहिक ‘सत्यशोधक’चा विशेषांक प्रकाशित
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी