पुणे : शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेला सलग सात दिवसांचा संप आणि मार्चअखेर यामुळे मालमत्ता खरेदी-विक्रीच्या दस्त नोंदणीसाठी नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालयांत गर्दी होत आहे. त्यामुळे शनिवारी (२५ मार्च) सुटीच्या दिवशी शहरातील पाच दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील ९८ बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांत सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे नोंदविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या सात दस्त नोंदणी कार्यालयांबरोबरच संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांत त्यांच्या प्रकल्पातील सदनिकांची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे.
हेही वाचा – अभियोग्यता चाचणीचा निकाल जाहीर, परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ ‘हँग’
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सात दिवस शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज विस्कळित झाले होते. १ एप्रिलपासून नवे चालू बाजार मूल्यदर (रेडीरेकनर) लागू होणार आहे. रेडीरेकनर दरांत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांची मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे कासारवाडी, एरंडवणा, शासकीय मुद्रणालय (फोटोझिंको) या ठिकाणी दस्त नोंदणी कार्यालये सुरू राहणार आहेत.